

गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात अचानक रक्तस्राव झाल्यानंतर ३१ वर्षीय महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर तिच्या गर्भाशयातील प्लॅसेंटा गर्भाशयाच्या भिंतीतून खोलवर वाढून मूत्राशयापर्यंत पोहोचल्याचं समोर आलं. प्रसूतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होण्याचा धोका असल्याने डॉक्टरांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र वेळेत निदान, प्रसूतीपूर्व नियोजन आणि विविध तज्ज्ञांच्या मदतीने या महिलेवर यशस्वी उपचार करण्यात आले. महिलेने १.३ किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. जन्मानंतर बाळाला पुढील उपचार आणि देखरेखीसाठी एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.
वसिंद, शहापूर मध्ये राहणारी ही महिला दुसऱ्यांदा गर्भवती राहिली होती. यापूर्वी त्यांची सिझेरियन प्रसूती झाली होती. गर्भधारणेच्या २८व्या आठवड्यात त्यांनी डोंबिवलीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नोंदणी केली. त्यावेळी केलेल्या तपासणीत प्लॅसेंटा गर्भाशयाच्या मुखाजवळ असल्याचं आढळलं.
त्यानंतर गर्भधारणेच्या ३०व्या आठवड्यात एमआरआय करण्यात आला. या तपासणीत प्लॅसेंटा गर्भाशयाच्या भिंतीमध्ये नेहमीपेक्षा जास्त खोलवर वाढल्याचं दिसून आलं. ती मूत्राशयापर्यंत पोहोचला असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. यानंतर ३१व्या आठवड्यात या महिलेला रक्तस्राव झाला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार करून रक्तस्राव नियंत्रणात आणला.
यानंतर पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली. या तपासणीत प्लॅसेंटा गर्भाशयाच्या भिंतीत आणखी खोलवर गेल्याचं दिसून आलं. प्लॅसेंटा एवढ्या खोलवर वाढल्यामुळे प्रसूतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होण्याचा धोका होता. त्यामुळे प्रसूतीपूर्वीच शस्त्रक्रियेचे योग्य नियोजन करण्यात आले.
याबाबत माहिती देताना एम्स हॉस्पिटलच्या प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रुती कोटांगळे यांनी सांगितलं की, पुन्हा केलेल्या सोनोग्राफीमध्ये प्लॅसेंटा गर्भाशयाच्या भिंतीमध्ये खोलवर वाढून मूत्राशयापर्यंत पोहोचल्याचं दिसून आलं. तसंच बाळाला होणारा रक्तपुरवठाही कमी झाल्याचं आढळलं. प्लॅसेंटा पर्क्रेटा ही गर्भावस्थेतील गंभीर स्थिती आहे. या स्थितीत प्लॅसेंटा गर्भाशयाच्या भिंतीत खूप खोलवर वाढते आणि जवळच्या अवयवांपर्यंतही पोहोचू शकतो. अशा वेळी प्रसूतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होण्याचा धोका असतो.
त्यामुळे या महिलेची प्रसूती होण्यापूर्वीच परिस्थितीचं अचूक निदान करण्यात आलं. शस्त्रक्रियेपूर्वी आवश्यक तेवढा रक्तसाठा तयार ठेवण्यात आला. भूल देणाऱ्या डॉक्टरांची टीम, अतिदक्षता विभागातील उपचारांची तयारी आणि इतर आवश्यक तज्ज्ञांची टीमही आधीच तयार ठेवण्यात आली. अशा गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेत निदान आणि योग्य नियोजन केल्यास गंभीर धोका टाळण्यास मदत होते, असं डॉ. श्रुती कोटांगळे यांनी सांगितलं.
प्रसूतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होण्याचा धोका लक्षात घेऊन इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. सुशील पाटील यांनी महाधमनीमध्ये म्हणजेच अॅओर्टामध्ये बलून कॅथेटर ठेवला. काही काळ रक्तप्रवाह नियंत्रित करण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या वेळी ज्या भागात प्लॅसेंटा वाढला होता, त्या भागातील रक्तस्राव कमी करण्यास मदत झाली.
यानंतर या महिलेला भूल देऊन नियोजित सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत त्यांनी १.३ किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. जन्मानंतर बाळाला पुढील उपचार आणि देखरेखीसाठी एनआयसीयूमध्ये हलवण्यात आलं. यानंतर डॉक्टरांनी ऑब्स्टेट्रिक हिस्टेरेक्टॉमी म्हणजेच गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेदरम्यान प्लॅसेंटा मूत्राशयाच्या पृष्ठभागापर्यंत वाढल्याचं दिसून आले. तसंच गर्भाशयाच्या खालच्या भागाभोवती मोठ्या प्रमाणात रक्तवाहिन्या तयार झाल्याचंही आढळलं.
डॉ. विवेक जाधव यांनी सांगितले की, प्लॅसेंटा मूत्राशयापर्यंत पोहोचल्याने शस्त्रक्रिया अधिक आव्हानात्मक होती. प्रभावित भागाची काळजीपूर्वक हाताळणी करणं आणि रक्तस्राव नियंत्रणात ठेवणं गरजेचं होतं. प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, मूत्ररोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये योग्य समन्वय असल्याने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण करता आली.
डॉ. श्रुती कोटांगळे यांनी पुढे सांगितले की, प्लॅसेंटा अॅक्रेटा स्पेक्ट्रम, प्लॅसेंटा पर्क्रेटा, ही गंभीर स्थिती आहे. यापूर्वी सिझेरियन झालेल्या महिला, प्लॅसेंटा गर्भाशयाच्या मुखावर असलेल्या महिला किंवा गर्भाशयावर यापूर्वी काही शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना गर्भावस्थेत अधिक काळजीपूर्वक तपासणीची गरज असू शकते.
वेळीच सोनोग्राफी आणि आवश्यक तपासण्या केल्यास अशा प्रकारच्या गुंतागुंतीचे प्रसूतीपूर्वीच निदान होऊ शकते. त्यामुळे प्रसूतीदरम्यान निर्माण होणाऱ्या धोक्याचा अंदाज घेऊन उपचारांचे योग्य नियोजन करता येते. गर्भवती महिलांनी नियमित तपासण्या करून घेणे आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या आवश्यक तपासण्या वेळेवर करणे गरजेचे आहे, असंही त्यांनी सांगितलं. प्रसूतीनंतर आई आणि बाळ दोघंही सुखरूप असल्याची माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.