
गेल्या काही वर्षांमध्ये किशोरवयीन मुलांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या दिसून येतात. यामध्ये लठ्ठपणाची समस्या वाढताना दिसतेय. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाच्या समस्या वाढल्याचं दिसून येतंय. वजन वाढल्यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराच्या समस्या वाढतात.
अर्ली चाइल्डहुड असोसिएशन (ECA-APER) आणि पोद्दार इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन यांनी केलेल्या अलीकडील सर्वेक्षणात एक चिंताजनक बाब आढळून आली आहे. भारतातील किशोवयीन मुलांपैकी जवळजवळ ४५% मुले जास्त वजनाची आहेत. त्यात असेही आढळून आले की २८% मुले कोणतेही शारीरिक व्यायाम करत नाहीत आणि ६७% मुले दररोज एका तासापेक्षा कमी वेळ शारीरीक क्रिया करतात.
१९९८ पर्यंत दिल्लीतील फक्त ७.४% मुले आणि चेन्नईतील ६.२% मुले जास्त वजनाची होती. २०१० मध्ये, दक्षिण कर्नाटकातील एका अभ्यासात असे आढळून आले की ९.९% किशोरवयीन मुले जास्त वजनाची आहेत आणि ४.८% लठ्ठपणाने ग्रासलेली आहेत. या सध्याच्या आकडेवारीवरून असं दिसून येतंय की, लठ्ठपणासारखा आजार खूप वेगाने वाढत चालला आहे.
सैफी, अपोलो आणि नमाहा हॉस्पिटल्समधील मेटाहील - लॅपरोस्कोपी आणि बॅरिएट्रिक सर्जरी सेंटरच्या बॅरिएट्रिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितलं की, लठ्ठपणा, जास्त वजन किंवा लठ्ठपणासह जगणे हे निरोगी आरोग्याचे लक्षण नाही. लठ्ठपणामुळे मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये संबंधित आजारांचा धोका वाढतो. यामध्ये किशोरवयीन मुलींमध्ये अकाली मासिक पाळी येणे, स्लीप एपनिया आणि श्वासोच्छवासाच्या समस्या वाढतात, फॅटी लिव्हर, टाइप २ मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा धोका वाढला आहे. या वयोगटातील लोकांमध्ये लठ्ठपणाच्या आत्मविश्वास ढासळणे, मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होणे यासारख्या समस्या जाणवतात. लठ्ठपणामुळे मुलांमध्ये न्युनगंड वाढत असल्याचे पहायला मिळते.
लठ्ठपणा अनेक घटक कारणीभूत ठरतात ज्यात वैयक्तिक, सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणीय घटकांचा समावेश आहे. प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा आहारातील वाढता समावेश शर्करायुक्त पेयांची उपलब्धता हे देखील वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. आज, मोठ्या फुड कंपन्यांद्वारे सेलिब्रिटी जंक आणि प्रक्रिया केलेले अन्नाची जाहिरात करतात, ज्यामुळे मुलं याकडे आकर्षित होतात. आकर्षक पॅकेजिंगच्या युक्त्यांमुळे मुलं याकडे आणखी आकर्षित होतात.
मुलं ही घरातील मोठ्यांचे अनुकरण करतात म्हणून संपूर्ण कुटुंबाने निरोगी आहाराचे सेवन करावे आणि निरोगी जीवनशैली बाळगली पाहिजे. यामध्ये शाळा देखील खूप महत्वाची भूमिका बजावते. शाळेत मुलांना डब्यात जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ न आणता पोषक आहाराचे सेवन करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. पुरेशी शारीरिक हालचाल आणि खेळांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात.
आजकाल मुलांनाही प्रचंड शैक्षणिक दबावाचा सामना करावा लागतो. पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. किशोरवयीन मुलांच्या वाढीसह त्यांच्या शरीराचा विकास होणे सामान्य आहे, परंतु जर त्यांचे वजन जास्त वाढले असेल तर तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.