एक महिला जेव्हा आई होणार असते तेव्हा तिच्या मनात अनेक प्रश्न येतात. होणाऱ्या आईला स्वत:सह आपल्या बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते. बाळ पोटात असताना महिलांवर अनेक निर्बंध लावले जातात. यामध्ये सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या काळात अनेक नियम पाळाणे, नखं न कापणे असे अनेक समज आहेत.
बाळाच्या आईच्या आरोग्यासाठी काही गोष्टी पिढ्यान् पिढ्या मानत आल्याने केल्या जातात. यातील अनेक गोष्टी अशाही आहेत ज्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. तर काही गोष्टी अशाही आहेत, ज्याचा खरोखर आपल्या बाळावर परिणाम होतो. त्यामुळे आज गर्भधारणेबाबत नागरिकांमध्ये असलेले काही समज आणि गैरसमज तसेच अफवांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
ओला नारळ खाल्ल्याने बाळ गोरं होतं?
काही जुन्या काळातील महिला, घरातील आजीबाई असं म्हणतात की नारळ खाल्ल्याने बाळ गोरं होतं. मात्र बाळाच्या रंगाचा आणि नारळाचा काहीही संबंध नाही. बाळाचा रंग हा पूर्णता त्याच्या आई वडिलांवर अवलंबून असतो. रंग प्रत्येकाला आनुवंशिकता नुसार मिळतो. त्यामुळे ओला नारळ खाल्ल्याने बाळ गोरं होतं ही अंधश्रद्धा आहे.
लोणचं खाल्ल्याने बाळ काळं होतं
काही महिला असं म्हणतात की लोणचं खाल्ल्याने बाळ काळं होतं. मात्र हा निव्वळ गैरसमज आहे. महिलांना गरोदरपणात जास्त आंबट खावेसे वाटते. काही महिला अगदीच जास्त प्रमाणात आंबट खातात. प्रमाणापेक्षा जास्त आंबट खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे महिलांनी आंबट कमी खावे यासाठी कोणीतरी असं म्हटलं असावं. मात्र नंतर हा समज सर्वत्र आजही पसरताना दिसतो आहे.
चंद्र ग्रहण आणि सूर्य ग्रहण पाळणे
ग्रहण सुरू असताना महिलांनी कोणतीही कामे करू नये. एकाजागी बसून फक्त देवाचे नामस्मरण करावे, कापणे, चिरणे अशी कामे करू नयेत. असा समज देखील काही ठिकाणी पसरवण्यात आला आहे. मात्र हा सुद्धा निव्वळ गैरसमज असून याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
नख आणि केस न कापणे
काही ठिकाणी महिला गरोदर असताना त्यांनी केस आणि नखं कापणे चुकीचे असते, याचा बाळावर परिणाम होतो, असं म्हटलं जातं. मात्र हा समज देखील कोणत्याही वैज्ञानिक आधारावर नाही.
चांगली गाणी ऐकणे आणि पुस्तके वाचणे
बाळावर आपण संस्कार करतो, तसेच संस्कार बाळ पोटात असताना सुद्धा त्यावर केले पाहिजे. त्यासाठी गर्भवती महिलेने सुंदर गाणी आणि चांगल्या विचारांचे आचरण केले पाहिजे. त्याचा परिणाम बाळावर आणि बाळाच्या मानसिकतेवर होत असतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.