पदरगड किल्ला रायगड जिल्ह्यात येतो. टेहळणी करणे हा या किल्ल्याचा मुख्य उद्देश होता. पदरगड किल्ला फारसा लोकांना माहीत नाही माञ चिमनी क्लाइंबिंगसाठी ट्रेकर्स या गडावर भेट देतात. फक्त अनुभवी ट्रेकर्सनीच या गडावर जावे. भीमाशंकर इथे असलेला पदरगड किल्ला त्याच्या अप्रतिम आकारामुळे प्रसिद्ध आहे. या गडाची उंची 1 हजार 490 फूट इतकी आहे.
पदरगड चिमनी क्लाइंबिंगसाठी पर्यटकांना खूप आकर्षित करतो. ज्या ट्रेकर्सला चिमणी क्लाइंबिंगचा थरारक अनुभव घ्यायचा असेल त्यांनी या गडावर एकदातरी भेट द्यावीच. पदरगडावरचा चिमणी क्लाइंबिंग थरार म्हणजे सहयाद्री मधील एक कठीण आव्हान आहे. पदरगड किल्ला कर्जत-भीमाशंकर मार्गावरील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी होता, असा इतिहास आहे. त्यामुळे या किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत. पदरगडावर दोन कातळ सुळके आहेत त्यांना 'कलावंतीणीचा महाल' या नावाने ओळखले जाते. किल्ल्यावर विविध लेणी, 7 पाण्याची टाकी, दगडी खडकाळ पायऱ्या आणि गडाच्या शिखरावरून थक्क करणारी निसर्गाची अद्भुत दृश्य तुम्हाला इथे दिसतील.
पदरगडावर कसे जावे?
मुंबईच्या CSMT रेल्वे स्थानकावरून कर्जतला जाण्यासाठी लोकल ट्रेन पकडा. त्यानंतर कर्जतला उतरून बस किंवा ऑटो रिक्षाने खांडस गावात उतरा. खांडस गावात जाण्यासाठी बसेसच्या फेऱ्या कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे खासगी गाडीने खांडस गावात जाण्यासाठी 700 ते 800 रूपये खर्च होतो. खांडस गावात उतरल्यानंतर भीमाशंकरला जाण्यासाठीचा पायी मार्ग म्हणजेच गणेश घाटाने जा. त्यानंतर साधारणपणे अर्ध्या तासाने एक विहीर येईल तेथून तुमचा ट्रेक सुरू होईल. साधारणपणे हा ट्रेक सर करण्यासाठी 3 ते 4 तास लागतात.
गडावर जाताना काय काळजी घ्यावी?
पदरगड सर करण्यासाठी गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आणि साहित्य सोबत असणे खूप आवश्यक आहे. किल्ला उतरताना रॅपलिंग तंत्राचा वापर करावा लागतो. त्यामुळे योग्य मार्गदर्शनाखालीच या गडावर भेट द्या. हा एक दिवसाचा ट्रेक असला तरी उतरेपर्यंत अंधार होतो. त्यामुळे सोबत टॉर्च ठेवाच. विशेष म्हणजे पावसाळा आणि त्यानंतरचे दोन महिने हा ट्रेक करू नये.
राहण्याची, खाण्याची सोय आहे का?
पदरगडावर राहण्याची आणि खाण्याची कसलीच सोय नाही. गडावर गुहा आहेत मात्र त्या गुहेतही तुम्ही राहू शकत नाही. शिवाय खांडस गावातही खाण्याची आणि राहण्याची कसलीच सोय नाही. त्यामुळे कर्जतला उतरून पोटभर खाऊन जा अन्यथा घरूनच जेवण किंवा सुका खाऊ सोबत ठेवा. गडावर पाण्याचीही सोय नाही त्यामुळे साधारणपणे 2 लिटर पाणी सोबत ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.