Harishchandragad Trekking : निसर्गाचं अद्भुत सौंदर्य! ट्रेकिंगसाठी हरिश्चंद्रगडावर जाताय? मग 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

Harishchandragad Trek Start Point Paachnai : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात हरिश्चंद्रगड आहे. हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील सर्वात आव्हानात्मक ट्रेकपैकी एक म्हणून ओळखला जातो. हा गड महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे.
Harishchandragad Trek Start Point Paachnai
Harishchandragad Trekking Saam TV
Published On

पावसाळा म्हटलं की सुंदर वातावरण अनुभवायला मिळते. अशातच पावसात ट्रेकिंग करणे म्हणजे एक वेगळाच सुखद अनुभव आहे. त्यामुळे आजच्या लेखात आम्ही तुम्हाला एका अश्या गडाविषयी माहिती देणार आहोत जिकडे गेल्यावर तुम्हाला साक्षात स्वर्गात गेल्यासारखे वाटेल.

Harishchandragad Trek Start Point Paachnai
Thane Tourist Places Banned: पुण्यानंतर ठाणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात हरिश्चंद्रगड आहे. हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील सर्वात आव्हानात्मक ट्रेकपैकी एक म्हणून ओळखला जातो. हा गड महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. या गडाची उंची 4 हजार 850 फूट आहे. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे.

हरिश्चंद्रगडाचा ट्रेक करताना तुम्हाला खडकाळ वळणावळणाचा रस्ता आणि उंच चढाई यासह विविध अडथळ्यांचा सामना करावा लागेल. सर्वात उंच असलेल्या हरिश्चंद्रगडाला भेट देण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या हंगामात सुंदर दृश्ये आणि आल्हाददायक वातावरण असते. चला तर मग जाणून घेऊयात या गडाविषयी सविस्तर माहिती.

१) हरिश्चंद्रगडावर काय काय बघता येईल?

- हरिश्चंद्रेश्वर मंदिर

हरिश्चंद्रेश्वर हे प्राचीन मंदिर सुमारे ४ हजार वर्षांपूर्वी बांधले गेलेले आहे असे म्हणतात. साधारणपणे १६ फूट उंच दगडामध्ये बांधलेल्या ह्या मंदिरावर अनेक शिलालेख आहेत. या मंदिराच्या उत्तरेला भव्य गुंफा असून आतील पाण्यातील चौथऱ्यावर भव्य शिवलिंग आहे. ज्यामुळे अनेक शिवभक्त येथे भेट देतात.

- पुष्कर्णी कुंड

हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळच पुष्कर्णी कुंड आहे. मंगळगंगेचा उगम ह्याच जागी होतो असे म्हटले जाते. विशेष म्हणजे गडावर इतिहासाची साक्ष देणारे आठ शिलालेख असून पुष्कर्णी कुंडावर देवाणगिरी मध्ये लिहिलेले शिलालेखही आहेत.

- कोकणकडा

गिर्यारोहकांचा जीव की प्राण असलेला कोकणकडा हा निसर्गाचा अदभुत चमत्कार आहे. तीन हजार फुटांपेक्षाही उंच असा हा कोकणकडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू ‘U’ या अक्षराच्या आकाराचा आहे. या कड्यावर आल्यावर देहभान हरपून जाते. ज्यांनी हा कोकणकडा पाहिला त्यांना जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते.

- तारामती शिखर

तारामती शिखर हरिश्चंद्रगडावरील सर्वात उंच शिखर आहे. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. समुद्रसपाटीपासून ४ हजार ६९५ उंची असलेले हे शिखर महाराष्ट्रतील सहाव्या क्रमांकाचे शिखर आहे.

२) हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी दोन मार्ग

- पाचनई मार्गे

हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट अहमदनगर जिल्ह्यातून आहे. यासाठी नाशिकच्या घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर गावी यावे. येथून गड चढण्यासाठी दोन तास लागतात. ही वाट फारच सोपी आहे. तसेच राजुर ते पाचनई अशी बससेवा उपलब्ध असल्याने इथून जाणे सोपे पडते.

- नळीची वाट

हरिश्चंद्रगडावर जाण्याची सर्वात कठीण वाट म्हणजे नळीची वाट आहे असं म्हटले जाते. नळीच्या वाटेने जाण्यासाठी बेलपाडा या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे लागते. येथून हरिश्चंद्रगडावर जाता येते. ही वाट फारच अवघड असल्याने ट्रेकिंगची नीट माहिती असलेल्यांनीच या वाटेतून जावे.

३) हरिश्चंद्रगडावर राहाण्याची आणि खाण्याची सोय आहे का?

- हरिश्चंद्रगडावर गुहांमध्ये राहाण्याची सोय होते. तसेच पैसे दिल्यास राहाण्यासाठी तंबू आणि इतर सुविधा उपलब्ध होतात.

- हरिश्चंद्रगडावर जेवणाची आणि पाण्याची सोय उपलब्ध आहे. उत्तम असे घरचे जेवण गडावर मिळते. हरिश्चंद्रगडावर गेल्यावर हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळच ही सोय उपलब्ध आहे.

४) सोबत काय ठेवावे?

पुरेसे पाणी, खाद्यपदार्थ, शूज, जास्तीचे कपडे, ORS पावडर, औषधे आणि फर्स्ट एड बॉक्स सोबत ठेवा. महत्वाचे म्हणजे गड खूप मोठा असल्यामुळे रस्ता चुकण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ग्रुपसोबत राहा आणि माहीत नसल्यास वाट विचारत जा. जास्त कडेवर जाऊन जीव धोक्यात घालू नका.

Harishchandragad Trek Start Point Paachnai
Thane Tourist Places Banned: पुण्यानंतर ठाणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com