

फॅटी लिव्हर म्हटलं की अनेकांच्या मनात दारूचं सेवन हे कारण लगंच येतं. मात्र दारू न पिणाऱ्या महिलांमध्येही फॅटी लिव्हरची समस्या वाढताना दिसतेय. मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील काम करणाऱ्या प्रत्येक तीन महिलांपैकी एका महिलेला फॅटी लिव्हरचा धोका असू शकतो. विशेष म्हणजे, सुरुवातीला या आजाराची कोणतीही ठळक लक्षणं दिसत नसल्याने अनेक महिलांना त्याची कल्पनाही नसते.
दिवसभर ऑफिसमध्ये ८ ते ९ तास सतत बसून काम करणं, वेळेवर जेवण न होणं आणि घाईघाईत काहीही खाणं याचा परिणाम यकृताच्या आरोग्यावर होऊ शकतो. शरीराची हालचाल कमी झाल्यामुळे चरबी जाळण्याची प्रक्रिया मंदावते. त्यात दिवसभर चहा-कॉफी आणि बिस्किटे खाणं, जेवण चुकल्यानंतर रात्री जड जेवण करणं आणि वारंवार डिलिव्हरीचे पदार्थ खाणे यामुळे शरीरात अतिरिक्त साखर आणि चरबी जाण्याची शक्यता वाढते.
यकृतामध्ये अतिरिक्त चरबी साठण्यापासून या समस्येची सुरुवात होते. त्याचे टप्पे साधारणपणे असे असतात-
स्टेज १- फॅटी लिव्हर : यकृतामध्ये चरबी साठते. या टप्प्यावर सहसा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
स्टेज २- सूज : यकृतामध्ये दाह किंवा सूज निर्माण होऊ लागते.
स्टेज ३- व्रण तयार होणे : यकृताच्या पेशींवर जखमांसारखे बदल होऊ लागतात.
स्टेज ४- कायमस्वरूपी नुकसान : यकृताला गंभीर आणि कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका असतो.
अनेकांना फॅटी लिव्हरची समस्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्यानंतर लक्षात येते. त्यामुळे सुरुवातीच्या काळातही शरीर देत असलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष न करणे महत्त्वाचे आहे.
पुरेशी झोप घेऊनही सतत थकवा जाणवणं
पोटाची चरबी कमी न होणं
जेवल्यानंतर वारंवार पोट फुगणं
त्वचा निस्तेज दिसणे किंवा डोळ्यांखाली डार्क सर्कल येणं
रक्ताच्या तपासणीत ALT किंवा AST वाढलेले आढळणं
ही लक्षणे केवळ फॅटी लिव्हरमुळेच असतील असे नाही. मात्र अशी लक्षणं जाणवत असतील किंवा रक्ताच्या तपासणीत ALT/AST वाढलेले असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
फॅटी लिव्हर सुरुवातीच्या टप्प्यात आढळल्यास जीवनशैलीत योग्य बदल करून तो सुधारण्याची शक्यता असते. त्यासाठी आहार आणि व्यायामाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
प्रत्येक जेवणात साधारण २० ग्रॅम प्रोटीन घेण्याचा प्रयत्न करा
रोजच्या आहारात फायबर आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा
प्रत्येक जेवणानंतर थोडे चालण्याची सवय लावा
आठवड्यातून नियमित स्ट्रेंथ ट्रेनिंग करा
साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा
जेवणाच्या वेळा वारंवार चुकवणं आणि नंतर एकाच वेळी खूप जड जेवणं टाळा
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.