Mother's Day 2024: मुंबईत राहणाऱ्या मुलीनं आपल्या आईला लिहिलेलं हृदयस्पर्शी पत्र!

Daughter Letter To Mother: आज देशभरात मदर्स डे साजरा केला जात आहे. आज आपण एका मुलीने आपल्या आईसाठी लिहिलेलं एक भावनिक पत्र पाहू या.
मुलीचं आईला पत्र
Daughter Letter To MotherSaam Tv
Published On

प्रिय आई,

आई आज तुझी खूप आठवण येत आहे गं. मला तुला खूप प्रश्न विचारायचे आहेत. माझ्या मनात विचारांचं काहूर उठलंय. पण त्याआधी तुला एक घट्ट मिठी माराविशी वाटत आहे. तुझ्या साडीचा पदर हातात घेऊन पुन्हा हट्ट करावासा वाटतोय. खरं तर ना मी प्रत्येक मिनीट मोजत आहे. सरांनी दोन दिवसांची सुट्टी दिलीय. २१ आणि २२ ला घरी येईल. परंतु हा मधला काळ मला काही वर्षांसारखा वाटत आहे.

सव्वीस एप्रिलच्या पहिल्या ठोक्याला तुझा कॉल नेहमी असतो. त्या दिवशीही तो होता. माझ्या वाढदिवसाच्या प्रेमळ सदिच्छा देणारा. गेली १० ते १२ वर्ष असंच घडतंय. कुणाचा फोन येवो न येवो, तुझा मात्र हमखास येतोय. कॉलेजसाठी बाहेर पडले ती आजही मी बाहेरच आहे. शिक्षण संपून नोकरीचा प्रवास सुरू झाला. या काळात खूप काही बदललं. पण तु मात्र तशीच आहेस गं. तुला बघितलं की वाटतं, घड्याळाचा काटा अजूनही तिथंच आहे. पुढे सरकलाच नाही. खरं सांगु आता होत नाही, तुझ्यापासून दूर राहावत नाहीये. परंतु, तु काही मला घरी येऊ देत नाही. तु सांगितल्याप्रमाणे मी माझा बड्डे नाही, तर पूर्ण बड्डे विक सेलिब्रेट केला. पण यात देखील काहीतरी कमी जाणवत होती.

अगं शाळेच्या पहिल्या दिवशी मला सोडायला आली, अन् आडोश्याला शाळा सुटेपर्यंत तु उभी राहिली होती. मला तुझी ती भर उन्हात तिष्ठत उभी राहलेली पाऊंल आजही नजरेसमोर आहेत. काही तासांसाठी आपल्या लाडक्या लेकीला नजरेआड होऊ न देणारी तु, इतके दिवस कसं काय लांब राहु शकतेस गं? मला एक सांग तुला माझी आठवण येत नाही का? तु मला विसरलीस तर नाही ना? तु सांगितल्याप्रमाणे मी माझा बड्डे नाही, तर पूर्ण बड्डे विक सेलिब्रेट केला. पण यात देखील काहीतरी कमी जाणवत होती. कारण मला सायंकाळी गोड तुपाचा शिरा मिळाला नाही, हॉटेलमधली महागडी पेस्ट्री हातात होती. पण माझी नजर मात्र त्यात तुला शोधत होती.

आठवीत असताना बाबांची अचानक एक्झीट झाली अन् सगळी जबाबदारी तुझ्या खांद्यावर आली. तु मात्र भलतीच खमकी, आईसोबत बापपण देखील तोऱ्यात मिरवलंस. सगळं कसं धीटपणे सांभाळलं. तीन लेकरांचं शिक्षण म्हणजे काही, सोपी गोष्ट नव्हती. पण तु मात्र निभवलंस खरं. बांगड्यांचा आवाज ऐकला का आई, मला खूप आनंद होतो गं, तु आल्याचा भास होतो. पण दुर्देव तो शेवटपर्यंत भासच राहतो. कितीदा म्हटलं तुला मुंबईला ये, मस्त फिरू. पण तु काही ऐकत नाही. तुझी माती तुला काही सुटत नाही, सुटेल तरी कशी घरी माझ्यापेक्षा जास्त जीव लावणारी जनावरं आहेत तुझी. मालकीन बाई गावाला गेली तर चारा खात नाही, फक्त मलाच नाही, तर सगळ्यांना माया लावली तु. सांग ना कसं जमलं ग तुला?

मुलीचं आईला पत्र
Mother's Day 2024: मे महिन्याचा दुसरा रविवार मातृदिन का साजरा केला जातो? घ्या जाणून

घरात पैसे नव्हते, दहावीची फी भरायची होती. तेव्हा तु तुझं मंगळसुत्र विकलं. आजही फक्त दोन मनी असलेली काळी पोतच तु घालते. पण ती तुला भलतीच शोभुन दिसते. बारावी झाली, पदवीचं शिक्षण झालं होतं. पण माझ्या डोक्यातून नोकरीचं भूत काही गेलं नव्हतं. जिथं मुलींना वेशीबाहेर जायला परवानगी नाही, तिथे तु मला हैद्राबाद काय दिल्लीपर्यंत पाठवलं. इतका विश्वास अन् हिंमत कुठून येते गं? तु सांग ना. आज बोल ना, मला हवी आहेत गं तुझ्याकडून काही प्रश्नांची उत्तरं.

माहितेय मागच्या आठवड्यात दोन दिवस तापाने फणफणले. झोपेत काहीतरी बडबडत होते, तेव्हा रूममेटने विचारलं काय हवंय, तेव्हा मी म्हणाले आई. तु मला प्रत्येक क्षणी का हवीय? मला अभ्यासात मदत व्हावी, म्हणून तु दिवसभर शेतात राबताना बातम्या ऐकायची. रात्री फोन झाला की, माझी चांगलीच उलट तपासणी करायची. फक्त तुझ्यामुळेच आज मी बातमी लिहू शकतेय. पहिली बातमीची बाराखडी तर तु गिरवलीस. आजही रात्री झोपलीस का, हा शेवटचा फोन अन् उठलीस का हा पहिला फोन तुझाच असतो. मला सांग तु दमत नाहीस का गं? झोपत नाहीस का, तु न थकणारं चोवीस तास चालणारं मशीन आहेस का? माहितेय सगळ्यांना वाटतं माझी आई छान उच्चशिक्षीत असणार पण तु तर फक्त नववी शिकलेली. कसं जमतं ग तुला हे सगळं जुळवून घेताना. तुला विश्वास बसणार नाही, मला खूप अभिमान वाटतो माझ्या आईचं शिक्षण सांगताना.

मुलीचं आईला पत्र
Mother's Day Gift: मदर्स डेला तुमच्या आईला द्या गिफ्ट; कमी किंमतींचे खास गिफ्ट

खूप मुली भेटल्या मला आजवर. परंतु कुणी त्यात माझी खास मैत्रिण बनु शिकलं नाही. कारण त्याची कधी गरज भासली नाहीस. मी तुझ्यासोबत हसते, खेळते मस्त जगते. तुच माझी बेस्ट फ्रेण्ड आहेस. मग इतर कुणाची रिप्लेंसमेंट कशी देईल. आपल्यात कधीचं वयाचं बंधन आलं नाही. तु मला स्वातंत्र्य दिलं हसण्याचं, बागडण्याचं, शिकण्याचं, नोकरीचं. सांग आई कसं जमतं तुला हे सगळं. आज मला याचं उत्तर हवंय कारण मला देखील उद्या आई व्हायचंच. माझ्या मुलीला पण तुझ्यासारखंच आईपण द्यायचंय. आज जसं मी स्वप्न जगतेय ना तसं तिला जगू द्यायचंय. तिला घडवायचंय, मलाही तुझ्यासारखी एक उत्तम आई व्हायचंय. खरं तर ना प्रत्यक्ष भेटते तेव्हा तुझ्या डोळ्यातल्या ममतेत हरवून जाते गं. हे सगळे प्रश्न विचाराचये राहून जातात. म्हणून आज मुद्दाम हे पत्र लिहितेय.

तुझ्यावर खूप प्रेम करते गं. माझी पहिली नोकरी, पहिलं प्रमोशन त्यानंतर आलेला तुझा कॉल. तेव्हा ओसंडून वाहणारा तुझा आनंद. त्यानंतर माझा दिल्ली जाण्याचा निर्णय, नोकरीवर आलेलं संकट सगळं काही तु खंबीरपणे पेलवलंस गं. कोशीश करने वालों की हार नाही होत दिदा. 'हा नाही तर त्याचा बाप दुसरा. आयुष्य रडण्यासाठी नाही, तर लढण्यासाठी आहे. प्रवास एकट्याचाच असतो. चल नवीन जॉब शोधु म्हणणारी तु, आज सांगच मला इतकी उमेद येते कुठून. आरश्यात बघितलं की मला तु दिसते. घरी येतेय मी, माझ्या प्रश्नांची उत्तरं तयार ठेव. आता हसु नको जास्त. कारण तुझ्या थकलेल्या डोळ्यात इतक्या दुरूनही माझ्या घरी येण्याच्या बातमीने आलेली आनंदाची चमक दिसतेय.

तुझीच दिदी

मुलीचं आईला पत्र
Mothers Day 2024: मदर्स डे'च्या दिवशी पाठवा खास शुभेच्छा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com