

प्रिय,
कामावरून रात्री उशिरा घरी आलो. नाशिकला सकाळी आजारी असलेल्या काकाला भेटायला जायचं होतं. त्या विचारात अवघ्या ४ तासांचीच झोप झाली. पहाटे ५ वाजता उठून घाईघाईत आवरलं. त्यानंतर कल्याण जंक्शनला पोहोचलो. नाशिकला जाणारी एक्स्प्रेस १० मिनिटे उशिरा येणार होती. या वेळेतच नाश्ता करून घ्यावा म्हणून स्टेशनच्या स्टॉलवर मसाला डोसा घेतला. डोसा खाणं सुरू असताना ट्रेन आली. पटकन हात धुतले आणि धावत ट्रेनमध्ये चढलो.
ट्रेनमध्ये गर्दी होती. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर एक सीट मिळाली. डोसा खाल्ल्यानंतर पाणी प्यायचं राहून गेलं होतं. समोरच्या प्रवाशाकडे पाणी मागितलं. त्यानंतर बरं वाटलं. झोप व्यवस्थित न झाल्याने डुलक्या लागत होत्या. त्यानंतर कधी झोप लागली कळलंच नाही. पुढे तासाभराने जाग आली. तोपर्यंत समोरच्या सीटवर पिकनिकला निघालेल्या तरुणींचा घोळका येऊन बसला होता. त्यात तू समोरच्या सीटवर मोबाइलवर रिल्स बघत होती.
नाशिक यायला खूप वेळ असल्याने बॅगेतील पुस्तक काढलं. वाचनात गुंग होतो, तेवढ्यात तू पुस्तकाबद्दस विचारलं. यामुळे संवादाला सुरुवात झाली. तू बिनधास्तपणे बोलत होती. कोणताही आडपडदा न ठेवता रोजच्या जगण्याच्या गोष्टी सहज सांगत होती. मी फारसं बोललो नाही. तुझं बोलणंच ऐकत होतो. ट्रेन पुढे जात होती, स्टेशन मागे पडत होती. यावेळेत मात्र आपली ओळख वाढत होती.
नाशिकला आल्यानंतर माझी घाई झाली. उतरतानाचा शेवटचा बाय खिडकीतून झाला. ट्रेन निघाली आणि या प्रवासात कायमची हरवलीस. आता पुन्हा भेट होईल की नाही, माहीत नाही. काही भेटी स्वप्नासारख्या असतात. त्या आयुष्यात फक्त आठवण म्हणूनच उरतात. तू तशीच एक आठवण आहेस.
– एक सहप्रवासी
तुमचं पत्र saamtextdigital@gmail.com या मेलवर पाठवा अथवा DM करा! आम्ही ते saamtv.esakal.com संकेतस्थळावर प्रसिद्ध करू.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.