

गर्भावस्थेदरम्यान केलेले पेल्विक(ओटीपोट) फ्लोअरचे व्यायाम मूत्राशय, गर्भाशय आणि आतड्यांना आधार देणारे स्नायू मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे प्रसूतीनंतर शरीराची रिकव्हरी अधिक चांगली प्रकारे होण्यास मदत होते. लघवीवर नियंत्रण न राहणं आणि पेल्विक फ्लोअरशी संबंधित इतर समस्या कमी होण्यासही या व्यायामांचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
खराडीतील मदरहुड हॉस्पिटलच्या प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. डॉ. प्रीथिका शेट्टी यांनी सांगितलं की, गर्भावस्थेत महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. बाळाचा आकार आणि वजन वाढत असताना पेल्विक फ्लोअरच्या स्नायूंवर अतिरिक्त दबाव येतो. हे स्नायू मूत्राशय, गर्भाशय आणि आतड्यांना आधार देण्यासोबतच गर्भावस्था, प्रसूती आणि प्रसूतीनंतरच्या रिकव्हरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
बाळाची जशी वाढ होते तसे या स्नायूंवर अधिक ताण येतो. त्यामुळे गर्भावस्थेदरम्यान साधे पेल्विक फ्लोअरचे व्यायाम केल्याने स्नायूंची बळकटी आणि त्यावरील नियंत्रण सुधारण्यास, अस्वस्थता कमी करण्यास आणि प्रसूतीनंतरच्या रिकव्हरीला मदत होऊ शकते. पेल्विक फ्लोअरचे व्यायाम प्रसूती सोपी होईल याची हमी देत नाहीत. मात्र प्रसूतीसाठी शरीराची तयारी करण्यास आणि प्रसूतीनंतर महिलांना जाणवणाऱ्या काही सामान्य समस्यांचा धोका कमी करण्यास ते उपयुक्त ठरू शकतात.
पेल्विक फ्लोअरचे व्यायाम ‘किगल एक्सरसाइज’ (Kegel Exercises) म्हणूनही ओळखले जातात. किगल व्यायाम हे पेल्व्हिक फ्लोअर स्नायू आकुंचन आणि शिथिल करण्यावर आधारित व्यायाम आहेत. हे व्यायाम अतिशय सोपे आहेत. यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची गरज भासत नाही आणि ते जवळपास कुठेही करता येतात. त्याचा सराव नियमितपणे केल्यास पेल्विक फ्लोअरच्या स्नायूंची बळकटी, लवचिकता आणि नियंत्रण सुधारण्यास मदत होते.
पेल्विक फ्लोअरचे स्नायू मजबूत असल्यास गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाला चांगला आधार देण्यास मदत करतात. तसंच मूत्राशयावर येणारा अतिरिक्त दबाव कमी होण्यासही मदत होऊ शकते. या व्यायामांचा नियमित सराव करणाऱ्या महिलांना गर्भावस्थेदरम्यान लघवी गळण्याची समस्या कमी जाणवू शकते. त्याचप्रमाणे पेल्विक फ्लोअरच्या स्नायूंची जाणीव आणि त्यावरील नियंत्रण वाढू शकते.
या स्नायूंना केवळ आकुंचन पावणंच नव्हे तर योग्य वेळी सैल सोडण्याचा सराव करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रसूतीदरम्यान बाळाला जन्म देताना हे स्नायू योग्य प्रकारे नियंत्रित केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.
मात्र केवळ पेल्विक फ्लोअरच्या व्यायामामुळे प्रसूतीचा कालावधी कमी होईल किंवा प्रसूती वेदनारहित होईल असं नाही. हे व्यायाम प्रसूतीसाठी स्नायूंना तयार ठेवण्यास आणि प्रसूतीनंतरची रिकव्हरी अधिक चांगली होण्यास मदत करू शकतात.
प्रसूतीनंतर, विशेषतः नैसर्गिक प्रसूतीनंतर, पेल्विक फ्लोअरचे स्नायू काही प्रमाणात कमकुवत होतात किंवा त्यावर ताण येऊ शकतो. अशावेळी नियमित व्यायामामुळे-
मूत्राशयावरील नियंत्रण सुधारण्यास आणि लघवी गळण्याची समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते.
पेल्विक फ्लोअरच्या स्नायूंची रिकव्हरी जलद होण्यास मदत होऊ शकते.
पोटाच्या खालच्या भागात किंवा पेल्विक भागात जडपणा जाणवण्याची भावना कमी होऊ शकते.
शौचावर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते.
स्नायूंची ताकद सुधारल्यामुळे लैंगिक आरोग्यासही फायदा होऊ शकतो.
भविष्यात पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स म्हणजे गर्भाशय किंवा इतर पेल्विक अवयव खाली सरकण्याचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टकडून योग्य तंत्र समजून घ्यावे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज व्यायाम करावा.
व्यायाम करताना श्वास सामान्यपणे घ्यावा; श्वास रोखून धरू नये.
पोट, मांड्या किंवा नितंबांचे स्नायू अनावश्यकपणे आवळू नयेत.
प्रसूतीनंतर डॉक्टरांनी व्यायाम करण्यास परवानगी दिल्यानंतरच पुन्हा सुरुवात करावी.
नियमित चालणं, संतुलित आहार आणि पुरेसं पाणी पिण्यासोबत हे व्यायाम करावेत.
पेल्विक फ्लोअरचे व्यायाम हे महिलांच्या आरोग्यासाठी सोपे आणि उपयुक्त ठरू शकतात. मात्र हे व्यायाम वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाहीत आणि ते प्रसूती सुलभ होण्याची हमीही देत नाहीत. योग्य मार्गदर्शनाखाली गर्भावस्थेच्या सुरुवातीपासूनच हे व्यायाम केल्यास पेल्विक फ्लोअरचे स्नायू मजबूत ठेवण्यास, गर्भावस्थेतील काही त्रास कमी करण्यास, प्रसूतीनंतरची रिकव्हरी सुधारण्यास आणि भविष्यातील पेल्विक फ्लोअरशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.