रोहित कदम, साम टीव्ही
दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूमुळे हजारो नागरिक आजारी पडतात. मात्र आता डेंग्यूपासून सुटकेचा मार्ग मोकळा होणार आहे. कारण भारतात डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच डीसीजीआय यांनी देशात पहिल्यांदाच डेंग्यूवरील लशीला मंजुरी दिलीये. ताकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडियाच्या 'क्यूडेंगा' (Qdenga) या लसीला बाजारात वापरण्याची परवानगी दिलीये. विशेष म्हणजे, देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच डेंग्यू लस असून डेंग्यूच्या चारही सीरोटाइप्सविरुद्घ ही लस अत्यंत प्रभावी ठरणार आहे.
- भारतातील पहिली स्वीकृत डेंग्यू प्रतिबंधात्मक लस
- 'टाकेडा' कंपनीच्या 'क्यूडेन्गा' (QDENGA) लसीला मंजुरी
- 4 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांसाठी लस उपयुक्त
- डेंग्यूच्या पूर्व संसर्गाच्या तपासणीशिवाय लस देता येणार
- जगभरातील 43 देशांमध्ये आधीच मंजुरी
भारतात लसीला मिळालेली मंजुरी 'ताकेडा'च्या जागतिक क्लिनिकल डेव्हलपमेंट प्रोग्रामवर आधारित आहे. याअंतर्गत फेज 1, फेज 2 आणि फेज 3 चे एकूण 19 क्लिनिकल ट्रायल्सही करण्यात आले आहेत. यात 28 हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी भाग घेतला. महत्त्वाचे म्हणजे, 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत 'क्यूडेंगा' या लसीचे उत्पादन देशातच केले जाणार आहे...
'क्यूडेंगा' (TAK-003) ही जपानची कंपनी ताकेडाने विकसित केलेली लस आहे. ताकेडाने हैदराबादस्थित नामांकित औषध कंपनी 'बायोलॉजिकल ई' सोबत एक करार केला आहे. त्यामुळे लसीचे उत्पादन भारतात होत असल्यामुळे जलद आणि अखंड पुरवठा होणार आहे. विशेष म्हणजे, लसीची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी उत्पादन देशातच होणार असल्याने, किंमत सर्वसामान्यांच्या अवाक्यात असण्याची शक्यता आहे.
जगातले तब्बल एक तृतियांश रुग्ण हे भारतात आढळतात. त्यामुळे भारतात डेंग्यूग्रस्तांची संख्या मोठी असते. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूचं प्रमाण वाढतं. त्यामुळे देशातील हवामान बदल आणि डासांच्या वाढत्या प्रजननामुळे संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन ही लस डेंग्यूच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय ठरण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.