
आजच्या डिजिटल युगात स्क्रीन टाईम वाढला असून टीव्ही, टॅब्लेट, फोन आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेली खेळण्यांचा वापर वाढला आहे. अनेक पालकांसाठी ही उपकरणं मस्तीखोर मुलांना शांत करण्यासाठी तसंच त्यांना व्यस्त ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. परंतु जास्त स्क्रीन एक्सपोजरचे दीर्घकालीन परिणाम समजून घेणं आवश्यक आहे.
पुण्यातील मदरहूड हॉस्पिटल्सच्या बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. प्रशांत लक्ष्मणराव रामटेककर यांनी सांगितलं की, जास्त स्क्रीन टाइम आता लहान मुलांमध्ये वारंवार मूड स्विंग्ज, उशिरा बोलणं, झोपेसंबंधी समस्या आणि समाजापासून दूर पळणं अशा समस्यांना कारणीभूत ठरते. मूल वाढत असताना निरुपद्रवी वाटणारे मनोरंजन हा चिंतेचा विषय बनू शकते. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार २ वर्षांखालील मुलांसाठी स्क्रीनपासून पूर्णपणे दूर ठेवणे आणि २-५ वयोगटातील मुलांचा स्क्रिनटाईम दिवसातून १ तासापेक्षा जास्त नसावा.
विविध अभ्यासांनुसार, स्क्रीनसमोर दिवसातून एक किंवा दोन तासांपेक्षा जास्त वेळ घालवणाऱ्या लहान मुलांना पुढील गोष्टींचा सामना करावा लागू शकतो:
विलंबित भाषा कौशल्ये: स्क्रीन टाइम वाढल्यास, वास्तविक जगातील संभाषणे कमी होतात, शब्दसंग्रह आणि भाषण विकास मंदावतो. मुलाला संभाषणे ठेवण्यात अडचण येऊ शकते.
चिडचिडेपणा आणि राग: स्क्रीन टाइम संपल्यावर मुले जास्त चिडचिडी किंवा निराश होऊ शकतात, ज्यामुळे सतत मूड स्विंग आणि स्वभावात आक्रमकता येते.
झोपेत व्यत्यय: हे ज्ञात सत्य आहे की स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश मेलाटोनिनच्या पातळीवर परिणाम करतो, ज्यामुळे लहान मुलांना झोप येणे आणि गाढ झोप लागणे कठीण होते. म्हणून ते नेहमी चिडचिडेपणा करतात.
एकाग्रता कमी होणे: वाचन किंवा खेळणे यासारख्या क्रियांमध्ये लक्ष केंद्रित न करु शकणे. मुलांना गुंतविण्याकरिता गोष्ट, अंगाई किंवा कविता वाचणे यासारख्या इतर क्रिया करणे सुरू करा.
समाजातील वावर कमी होणे: जास्त स्क्रीनटाईममुळे मौखिक संवाद कमी होत चालला आहे. मूल नेहमी फोनवर वेळ घालवू लागते आणि इतरांशी संवाद साधणे टाळते.
अनेक पालकांना हे कळत नाही की सतत अस्वस्थ वाटणं, झोप न लागणं किंवा स्क्रीन टाइमनंतर चिडचिडेपणा वाढणं यासारखी लक्षणं दिसून येतात. स्क्रीनचा वापर हा मुलांना शांत करण्यासाठी किंवा कौतुकासाठी केला जात असल्याने, मुलं बहुतेकदा डिजिटल डिव्हाइसवरच अवलंबून राहणे पसंद करतात.
लहान मुलांसाठी दररोज एक तासाचा स्क्रीन टाइम पुरेसा आहे. बेडरूम, डायनिंग टेबल आणि कौटुंबिक वेळेत पालकांनी देखील स्क्रीनचा वापर करणे टाळा.
पालकांनी रील स्क्रोल करण्याऐवजी त्यांच्या मुलांसोबत शैक्षणिक खेळ खेळावे.
सुट्टीच्या दिवशी मुलांसोबत मैदानी खेळ खेळ खेळावे. नृत्य, संगीत, बागकाम, चित्रकला आणि मुलांसोबत कोडे सोडवणे यासारख्या क्रिया करा.
पालकांनी त्यांच्या मुलाभोवती असताना त्यांचा स्क्रीन वापर मर्यादित करणे गरजेचे आहे. असे केल्याने तुम्हाला मुलाशी चांगले संबंध प्रस्थापित करता येतील.
मुलाला इतरांशी संवाद साधण्यास प्रोत्साहित करा. स्क्रीनचा वापर कमी करणे आणि मुलांचे जीवनमान सुधारणे ही काळाची गरज असून यात पालंकांची भूमिका महत्त्वाची आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.