
बॉवेल कॅन्सरची लक्षणे सुरुवातीला सौम्य असतात.
शौचाच्या सवयीत बदल हा प्राथमिक इशारा आहे.
शौचात रक्त दिसणे गंभीर लक्षण आहे.
बॉवेल कॅन्सर (Colorectal cancer) हा जगभरात लोकांमध्ये आढळणारा सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे. मात्र बऱ्याच जणांना आपल्याला या कॅन्सरचा धोका आहे हे खूप उशिरा समजतं. मात्र त्यावेळी हा कॅन्सर पुढच्या टप्प्यावर पोहोचलेला असतो. कारण, सुरुवातीची लक्षणं खूप सौम्य किंवा अगदी सामान्य असतात.
बॉवेल कॅन्सर म्हणजे आतड्यांचा कॅन्सरची लक्षणं पोटदुखी, अपचन, जुलाब यासारख्या त्रासांसारखी वाटतात. पण हीच लक्षणं जर वेळेत ओळखली गेली, तर हा कॅन्सर बरा होऊ शकतो. त्यामुळे शरीर काही संकेत देत असेल जरी ते सुरुवातीला किरकोळ वाटत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करु नका.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आतड्यांचा कॅन्सर झाला की शरीर आपल्याला काही संकेत देतं. अशावेळी शरीरात दिसणारे बदल ओळखणं गरजेचं आहे.
आतड्यांच्या कॅन्सरचं एक सुरुवातीचं लक्षण म्हणजे शौचाच्या सवयीत सतत बदल होणं. यामध्ये सामान्यपेक्षा वारंवार शौचाला जावं लागणं, कॉन्स्टिपेशन हे त्रास दिसून येतात. काहींना शौच झाल्यानंतरही पोट पूर्ण साफ झालं नाही असं वाटतं. हे बदल अधूनमधून होणं सामान्य असू शकतं पण जर तीन आठवड्यांहून अधिक काळ हा बदल कायम राहिला, तर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे.
शौचात रक्त दिसणं ही एक गंभीर सूचना असू शकते. जरी काही वेळा पाईल्ससारख्या सौम्य कारणामुळेही रक्त जाऊ शकतं, तरी ते बॉवेल कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षणही ठरू शकतं. हे रक्त कधी थेट लालसर, तर कधी शौचात मिसळलेलं गडद रंगाचं असू शकतं. जर वारंवार रक्त दिसत असेल आणि त्यासोबत अशक्तपणा किंवा वजन कमी होणं जाणवत असेल, तर लवकरात लवकर तपासणी करून घ्या.
ज्या वेळी आहारात किंवा जीवनशैलीत फारसा बदल न करता वजन कमी होतंय तेव्हा ते धोकादायक असू शकते. बॉवेल कॅन्सरमध्ये शरीरात वाढणाऱ्या पेशी शरीरातील उर्जा वापरण्याची पद्धत बदलतात आणि त्यामुळे अनपेक्षित वजन घटतं. याशिवाय कॅन्सरमुळे अन्नातील पोषकतत्त्वांचं शोषण व्यवस्थित होत नाही किंवा शरीरात सूज येते.
जर वारंवार पोटात वेदना, गॅस, जडपणा किंवा पोट फुगल्यासारखं जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कॅन्सरमुळे आतड्यांमध्ये गाठ तयार होऊन ती पचनसंस्थेला अडथळा आणू शकते. सुरुवातीला हे लक्षण गॅस किंवा अपचन म्हणून टाळलं जातं, पण जर हा त्रास कायम राहिला, आणि सोबत वजन कमी होणं किंवा शौचाच्या सवयी बदलणं दिसलं, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
बॉवेल कॅन्सर म्हणजे काय?
बॉवेल कॅन्सर म्हणजे आतड्यांमध्ये (लांब आतडे आणि मलाशय) अनियंत्रित पेशी वाढ होऊन कॅन्सर निर्माण होणे.
शौचाच्या सवयीत बदल का धोकादायक आहे?
शौचाच्या सवयीत तीन आठवड्यांहून अधिक काळ बदल राहिल्यास तो आतड्यातील गाठीचा किंवा कॅन्सरचा संभाव्य संकेत असू शकतो.
शौचात रक्त दिसण्याचे कारण काय असू शकते?
शौचात रक्त दिसणे पाईल्समुळे होऊ शकते, पण ते बॉवेल कॅन्सरचे प्रारंभिक लक्षणही असू शकते, विशेषतः जर ते वारंवार दिसत असेल.
अचानक वजन कमी होण्याचे कारण काय असू शकते?
बॉवेल कॅन्सरमुळे शरीराची ऊर्जा वापरण्याची पद्धत बदलते आणि पोषकतत्त्वांचे शोषण कमी होते, ज्यामुळे वजन कमी होते.
पोटात सतत दुखणे हे का गंभीर आहे?
कॅन्सरमुळे आतड्यांमध्ये गाठ तयार होऊ शकते, जी पचनास अडथळा आणते. त्यामुळे पोट फुगणे, गॅस, जडपणा आणि वेदना होऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.