
उच्च रक्तदाब हा एक 'सायलेंट किलर' आहे.
सतत डोकेदुखी हा उच्च रक्तदाबाचा धोक्याचा इशारा आहे.
चक्कर येणे म्हणजे रक्तप्रवाहातील अडथळ्याचे लक्षण आहे.
हाय ब्लड प्रेशर, ज्याला आपण उच्च रक्तदाब म्हणतो हे सध्याच्या काळात जागतिक पातळीवर हृदयविकार आणि अकाली मृत्यूचा एक प्रमुख कारण आहे. या आजाराला 'साइलेंट किलर' असंही म्हटलं जातं कारण सुरुवातीला याची लक्षणं फारशी दिसून येत नाहीत. मात्र वेळेवर लक्ष दिलं नाही तर स्ट्रोक, हृदयविकार, किडनी निकामी होणं आणि अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात.
अमेरिकेतील आकडेवारीनुसार, जवळपास अर्ध्या लोकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे. मात्र त्यातले बरेच लोक त्याच्या धोक्याची जाणीव नसल्यामुळे उपचार घेतच नाहीत. त्यामुळे काही विशेष लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्याची वेळीच नोंद घेणं गरजेचं आहे.
कधीकधी कोणताही ठोस कारण नसताना वारंवार होणारी डोकेदुखी ही उच्च रक्तदाबाचं लक्षण असू शकतं. विशेषतः सकाळी उठल्यावर डोकं ठणकणं, जोरात ठोकल्यासारखं वाटणं, औषध घेऊनही काही फरक न पडणं अशा प्रकारच्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नये. मेंदूतील रक्तवाहिन्यांवर ताण आल्यामुळे असं होऊ शकतं.
वारंवार चक्कर येणं किंवा डोळ्यांपुढे अंधारी येणं हे शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित न चालल्याचं लक्षण असू शकतं. उच्च रक्तदाबामुळे शरीराच्या विविध अवयवांमध्ये ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचत नाही आणि त्यामुळे अशक्तपणा किंवा अचानक भोवळ येऊ शकते.
धुसर दिसणं, डबल दिसणं किंवा अचानक दृष्टिहीनता येणं ही लक्षणं ‘हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी’ची असू शकतात. या स्थितीत डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांना नुकसान होतं. वेळेवर लक्ष दिलं नाही तर कायमस्वरूपी दृष्टीदोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांच्या दृष्टीमध्ये जर काही अडचण जाणवली तर तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
काही लोकांना वय किंवा वजन न वाढवता देखील थोडसं काम केल्यावर दम लागतो. हे लक्षणसुद्धा हाय ब्लड प्रेशरचं असू शकतं. हृदयावर जास्त ताण पडल्यामुळे फुफ्फुसांमध्ये पाणी साचण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे श्वास घ्यायला अडचण होते.
छातीत जडपणा वाटणं, दुखणं किंवा हालचाली करताना अस्वस्थ वाटणं ही देखील एक गंभीर सूचना असते. उच्च रक्तदाबामुळे हृदयावर ताण येतो आणि त्यामुळे अँजिना किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. जर छातीत वेदना होत असतील आणि त्यासोबत घाम येणं, मळमळणं किंवा डाव्या हातात वेदना जाणवणं असेल तर तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.
वरील लक्षणांपैकी एक किंवा अधिक लक्षणं सतत जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन रक्तदाब तपासून घ्या. कारण वेळेवर निदान झाल्यास योग्य उपचारांमुळे धोका टाळता येतो.
उच्च रक्तदाबाला 'सायलेंट किलर' का म्हटले जाते?
उच्च रक्तदाबाची सुरुवातीची लक्षणे फारशी दिसून येत नाहीत, पण तो गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो, म्हणून त्याला 'सायलेंट किलर' म्हणतात.
डोकेदुखी उच्च रक्तदाबाचे लक्षण कसे असू शकते?
वारंवार होणारी, विशेषतः सकाळी उठल्यावरची आणि औषधाने न मिटणारी डोकेदुखी मेंदूच्या रक्तवाहिन्यांवरील ताणाचे लक्षण असू शकते.
दृष्टीमध्ये बदल कोणत्या स्थितीचे लक्षण आहे?
धुसर दिसणे, डबल दिसणे किंवा अचानक दृष्टी कमी होणे हे 'हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी'चे लक्षण आहे, ज्यामध्ये डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांना नुकसान होते.
श्वास घेण्यास त्रास होण्याचे कारण काय?
उच्च रक्तदाबामुळे हृदयावर ताण येतो आणि फुफ्फुसांमध्ये पाणी साचू शकते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
उच्च रक्तदाबाची लक्षणे जाणवल्यास काय करावे?
लक्षणे जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन रक्तदाब तपासून घ्यावा. वेळेवर निदान आणि उपचारामुळे गंभीर परिणाम टाळता येतात.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.