High BP signs young age: तिशीतही होतोय उच्च रक्तदाबाचा त्रास; शरीरात 'हे' 6 मोठे बदल दिसले तर वेळीच घ्या डॉक्टरांची मदत
उच्च रक्तदाब आता फक्त वृद्धांपुरता मर्यादित न राहता तरुणांमध्येही वाढत आहे.
बसण्याची सवय, तणाव, अनियमित आहार आणि झोपेची कमतरता रक्तदाब वाढवण्याची कारणे आहेत.
उच्च रक्तदाबाची लक्षणे सूक्ष्म असतात, त्यामुळे ती वेळीच ओळखणे गरजेचे आहे.
उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन हा पूर्वी प्रामुख्याने वयानुसार वाढणारा आजार मानला जायचा. मात्र आता २०-३० वयोगटातील अनेक तरुणांमध्येही तो वेगाने आढळून येतो. बसून राहण्याची सवय, तणाव, प्रक्रिया केलेला आणि मीठ‑साखरेने भरलेला आहार, झोपेची कमतरता या सगळ्यांमुळे रक्तदाब लवकरच वाढू शकतो.
अगोदर फक्त प्रौढ व्यक्तींमध्ये दिसणारा आजार आता तरूणांनाही मोठ्या प्रमाणात होतोय. मुख्य म्हणजे याची बहुतेक वेळा कोणतीही मोठी लक्षणं दिसत नाही. तरीही शरीर काही सूक्ष्म संकेत देतं ते वेळीच ओळखणं गरजेचं आहे. ही लक्षणं कोणती आहेत ते पाहणं फार गरजेचं आहे.
सतत होणारी डोकेदुखी
एखाद्या दिवशी थकवा, झोप न लागणं किंवा जेवण चुकणं यामुळे डोकेदुखी होणं स्वाभाविक आहे. पण तुम्ही वारंवार सकाळी उठताना डोके जड झाल्यासारखं वाटतंय का? विशेषतः डोक्याच्या मागील भागात ठणकणारी वेदना जाणवतेय का? हे वाढत्या रक्तदाबाचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.
थकवा, दमणं
पूर्ण झोप झाल्यावरही अंगात ताकद राहत नाही. अशावेळी लक्ष केंद्रित होत नाही, निर्णय घ्यायला वेळ लागतो. अनेकदा आपण याला स्ट्रेसचं नाव देतो. मात्र रक्तदाब वाढल्यामुळे मेंदूकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो आणि हीच लक्षणं दिसू शकतात.
दृष्टी धूसर होणं
डोळ्यांतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर उच्च रक्तदाबाचा थेट परिणाम होतो. त्यामुळे हळूहळू दृष्टी कमी होणं, धूसर दिसणं, अचानक फोकस बिघडणं अशी लक्षणं दिसू शकतात. अशावेळी तुम्ही तातडीने डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.
लगेच धाप लागणे
एक जिना चढल्यानंतर छाती धडधडणं, श्वास चढणं असा त्रास जाणवत असेल तर तुम्ही सावध झालं पाहिजे. पण किरकोळ कामांतही वारंवार दम लागत असेल, श्वासोच्छ्वास वेगाने होत असेल तर ते हृदयावर येणाऱ्या ताणाचं लक्षण असू शकतं. उच्च रक्तदाबामुळे हृदयाला अधिक शक्तीनं काम करावं लागतं आणि दीर्घकाळ तसेच राहिल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
छातीत धडधड जाणवणं
हृदय जोरात धडधडणं, छातीत दडपण येणं ही लक्षणं दुर्लक्षित करू नयेत. प्रत्येक छातीदुखी म्हणजे हार्ट अटॅकच असतो असं नाही. पण जर सोबत थकवा, श्वास लागणं किंवा घाम येणं यांसारखी इतर चिन्हंही असतील तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.
नाकातून वारंवार रक्तस्राव होणं
कोरडं हवामान, ऍलर्जीमुळे कधी कधी नाकातून रक्त येऊ शकतं. पण वारंवार, अचानक, आणि कोणतंही कारण नसताना नाकातून रक्त यायला लागलं, तर अचानक वाढलेल्या रक्तदाबाची ही खूण असू शकतं. अशावेळी डॉक्टरांकडे जाऊन बीपी तपासणं आवश्यक आहे.
उच्च रक्तदाब तरुणांमध्ये का वाढत आहे?
बसून राहण्याची सवय, तणाव, अनियमित आहार आणि अपुरी झोप यामुळे तरुणांमध्ये रक्तदाब वाढत आहे.
उच्च रक्तदाबाचे सुरुवातीचे लक्षण कोणते?
सकाळी डोक्यामागे ठणकणारी डोकेदुखी हे उच्च रक्तदाबाचे सुरुवातीचे लक्षण आहे.
रक्तदाब वाढल्यामुळे दृष्टीवर काय परिणाम होतो?
उच्च रक्तदाबामुळे डोळ्यांतील रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन दृष्टी धुंद होऊ शकते.
छातीत धडधड जाणवणे हे का गंभीर आहे?
छातीत धडधड जाणवणे हृदयावर ताण असल्याचे सूचित करते आणि हृदयविकाराचा धोका असू शकतो.
नाकातून वारंवार रक्त येण्याचे कारण काय असू शकते?
नाकातून वारंवार रक्त येणे हे अचानक रक्तदाब वाढल्याचे संकेत असू शकते.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.