Gauri Pujan 2022 : गौरीला आदिशक्तीचे रुप मानले जाते. गौरीगणपतीचा सण महाराष्ट्रात अगदी मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी गौरीची स्थापना केली जाते.
गौरीला गणपतीच्या (Ganpati) आईचे रूप मानले जाते. त्यामुळे शंकर भगवान, पार्वती माता आणि गणपती बाप्पा सहकुटुंब आपल्या घरी आल्याची भावना या प्रथेमागे दडलेली असते. त्यात गौराईला घरातील माहेरवाशिणीचे स्थान दिले जाते.
वाजत-गाजत गौराईला घरी आणले जाते. गौरीला साडी नेसवून तिला नटवले जाते. गौरीची स्थापना व इतर तयारी घरातील माहेरवाशिणीच्या हातून केली जाते. काहींच्या घरी खड्यांची, तेरड्याची गौर बसवली जाते तर काहींकडे जेष्ठा-कनिष्ठा, महालक्ष्मींची पूजा केली जाते.
कोकणात (Kokan) रत्नागिरी, रायगडमधील काही प्रांतात ओवसा/ववसा ही पद्धत अगदी मोठ्या श्रद्धेने केली जाते. लग्नानंतर ज्यावर्षी गौरी पूर्वा नश्रत्रांमध्ये येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे.
ओवसा/ववसा करण्याची पध्दत -
एका सुपात ५ प्रकारच्या भाज्या, ५ वेलींची पाने, ५ प्रकारची फळे, करंडा फणी, ओटी (खण व नारळ)आणि वानाच्या पानावर सुटे पैसे असे सर्व प्रत्येक सुपात ठेवून, अशी ५ सुपे गौरीच्या पुढ्यात वोवसन्यासाठी/ ओवसा करण्यासाठी/भरण्यासाठी ठेवतात. घरातील सुवासिनी गौरीला पहिले हळद-कुंकू लावून गौरीची पूजा करतात. नंतर भरलेले सूप धरून गौरी समोर खाली ३ वेळा सूप ओढायचे असते. या प्रकियेला गौरीला वोवसने असे म्हटले जाते.
ओवसा प्रथेमागचं महत्त्व -
गौरीही आदिशक्तीचे रुप आहे. अशा शक्ती रुपी असणाऱ्या गौराईची ओटी भरुन तिच्यासारखे सामर्थ्य आपल्या मुलींना व सुनांना मिळावे अशी प्रथा आहे. गौराईची पूजा व अर्चना करुन तिच्याकडून आर्शिवाद घेतला जातो. या दिवशी नववधूचा मान पहिला असतो.
गौरीला ओटी सूपाने भरली जाते त्यामागचे अनेक कथा आहेत. सुप हे घरातील सुबत्तेचं लक्षण मानले जाते. भरलेले सूप देणे हे ऐश्वर्याच व मांगल्याचे प्रतिक मानले जाते. या निमित्ताने सुपे वाटातान नव्या सुनेला थोरा मोठ्यांची ओळख होते व आर्शिवाद देखील मिळतो.
गौरीच्या आगमनानंतर अनेक घरामध्ये सर्व महिला एकत्र येत झिम्मा-फुगडी, बस-फुगडी असे खेळ रात्रीपर्यंत खेळतात. घरी आलेल्या माहेरवाशिणीसोबत रात्र जागवली जाते. गौराईच्या पाहुणचारात कोणतीही गोष्ट कमी पडून दिली जात नाही.
सध्या काळानुरुप या परंपरेत अनेक बदल झालेले दिसतात. पारंपारिक पध्दतीने विणलेली सुपे हल्ली बाजारात मिळत नाही परंतु, गौरी गणपतीच्या काळात या सुपांना अधिक महत्त्व आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.