

डोळे हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे तसंच मोबाईल-लॅपटॉपच्या वाढत्या वापरामुळे डोळ्यांवर मोठा ताण येणार आहे. आपल्या दैनंदिन जीवनाच्या अनेक छोट्या सवयींकडे आपण दुर्लक्ष करतो. पण याच सवयी भविष्यात धोकादायक ठरू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय.
शरत मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटलचे चीफ मेडिकल डायरेक्टर डॉ. चिलुकुरी शरथ बाबू यांनी आठ सवयींबद्दल माहिती दिली आहे. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं. योग्य वेळी या सवयी बदलल्यास डोळ्यांचं आरोग्य दीर्घकाळ चांगले राहू शकतं.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप किंवा टॅबशिवाय काम करणं कठीण आहे. मात्र सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे डोळे कोरडे पडणं, धूसर दिसणं, डोकेदुखी अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
उन्हात बाहेर पडताना अनेक जण डोळ्यांचं संरक्षण करत नाहीत. अल्ट्राव्हायोलेट म्हणजेच UV किरणांचा डोळ्यांवर दीर्घकालीन वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे मोतीबिंदू, मॅक्युलर डीजेनरेशन आणि काही गंभीर डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो.
डोळे थकले की किंवा खाज आली की अनेकजण लगेच डोळे चोळतात. ही सवय धोकादायक ठरू शकते. हातावरील धूळ, जंतू आणि बॅक्टेरिया डोळ्यांत जाऊन संसर्ग होण्याचा धोका वाढतो. सतत दबाव आल्यामुळे कॉर्नियालाही नुकसान होऊ शकतं.
कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. लेन्स नीट साफ न करणं किंवा दूषित सोल्युशन वापरणं यामुळे डोळ्यांना गंभीर इन्फेक्शन होऊ शकते. तसंच जास्त वेळ लेन्स वापरल्याने कॉर्नियाला ऑक्सिजन कमी मिळतो आणि त्यामुळे कोरडेपणा व जळजळ जाणवू शकते.
अनेक डोळ्यांचे आजार सुरुवातीला कोणतीही लक्षणं दाखवत नाहीत. ग्लॉकोमा, डायबेटिक रेटिनोपॅथी किंवा वयोमानानुसार होणारे काही आजार तपासणीतूनच लवकर सापडू शकतात. वेळेवर तपासणी न केल्यास उपचार उशिरा होऊन दृष्टी गमावण्याचा धोका वाढू शकतो.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली की त्याचा परिणाम डोळ्यांवरही होतो. डोळे कोरडे पडणं, जळजळ होणं आणि अस्पष्ट दिसणं अशा तक्रारी वाढू शकतात. शरीर हायड्रेट ठेवणं हे डोळ्यांच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचं आहे.
डोळ्यांना योग्य विश्रांती मिळणं अत्यंत आवश्यक आहे. झोपेमुळे डोळे पुन्हा ताजेतवाने होतात आणि त्यांना आवश्यक ओलावा मिळतो. सतत कमी झोप घेतल्यास डोळे थकणं, ड्राय आय सिंड्रोम आणि इतर समस्या वाढू शकतात.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहार महत्त्वाचा असतो. शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन A, C, E तसंच ओमेगा-3 फॅटी अॅसिड कमी प्रमाणात मिळाल्यास डोळ्यांच्या समस्या वाढतात. हिरव्या भाज्या, फळे आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास डोळे निरोगी राहण्यास मदत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.