Fitness Tips: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. ऑफिसचे काम, घरातील जबाबदाऱ्या आणि सततची धावपळ यामुळे व्यायामासाठी वेळ काढणे अनेकांसाठी कठीण होते. यामुळे अनेकजण फिटनेसकडे दुर्लक्ष करतात. मात्र, अशा लोकांसाठी 'वीकेंड वॉरियर' हा फिटनेस ट्रेंड फायदेशीर ठरू शकतो. या ट्रेंडनुसार आठवड्यातील शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांत व्यायाम करूनही वजन कमी करता येतं तसेच फिट राहायला मदत मिळू शकतात.
'वीकेंड वॉरियर' म्हणजे आठवडाभर कामात व्यस्त असल्यामुळे नियमित व्यायाम न करू शकणारे लोक सुट्टीच्या दोन दिवसांत व्यायामासाठी वेळ काढतात. सोमवार ते शुक्रवार कामाच्या व्यापामुळे व्यायाम करणे शक्य होत नाही. त्यामुळे शनिवार आणि रविवार या दिवसांत चालणे, धावणे, सायकलिंग, योगासने किंवा जिममध्ये वर्कआउट करून फिट राहण्याचा प्रयत्न केला जातो. आठवड्याभरात करावयाचा शारीरिक व्यायाम एक किंवा दोन दिवसांत पूर्ण करणाऱ्या व्यक्तींनाही फायदे मिळू शकतात. त्यामुळे दररोज व्यायामासाठी वेळ मिळत नसल्यास वीकेंडला व्यायाम करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, व्यायामाचा कालावधी आपल्या शारीरिक क्षमतेनुसार असणे आवश्यक आहे.
आठवड्यातून दोन दिवस नियमित व्यायाम केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. चालणे, सायकलिंग आणि कार्डिओ यांसारख्या व्यायामांमुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारण्यास मदत मिळते. तसेच नियमित शारीरिक हालचालींमुळे वजन नियंत्रणात ठेवणेही सोपे होते. व्यायामासोबत संतुलित आहार घेतल्यास वजन कमी करण्याच्या मदत होऊ शकते. याशिवाय वेट ट्रेनिंग, स्क्वॅट्स आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने स्नायू मजबूत होतात. शरीराची ताकद आणि सहनशक्ती वाढण्यास मदत मिळते. नियमित व्यायामामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि शरीराची इन्सुलिन कमी होण्यास मदत होते. व्यायामाचा परिणाम केवळ शारीरिक आरोग्यावरच होत नाही, तर मानसिक आरोग्यावरही होतो. नियमित शारीरिक हालचालींमुळे तणाव कमी होण्यास, मन प्रसन्न राहण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत मिळू शकते.
वीकेंडला व्यायाम करताना अचानक अति व्यायाम करण्याची चूक करू नका. सुरुवातीला हलका व्यायाम करून हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा. व्यायामापूर्वी वॉर्मअप आणि व्यायामानंतर स्ट्रेचिंग करणे महत्त्वाचे आहे. तसेच शरीराला पुरेशी विश्रांती द्या आणि योग्य आहार घ्या. व्यायाम न केलेल्या व्यक्तींनी व्यायाम सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.