

महिला अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. एंडोमेट्रिओसिस आणि ओव्हेरियन सिस्ट या समस्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतायत. सुरुवातीला दिसणारी किरकोळ लक्षणं महिलांकडून सामान्य समजून दुर्लक्षित केली जातात. मात्र शरीरात होणारे छोटे बदलही कधी कधी गंभीर समस्येचे संकेत देऊ शकतात.
एंडोमेट्रिओसिस हा प्रामुख्याने प्रजननक्षम वयातील महिलांमध्ये आढळणारी समस्या आहे. या अवस्थेत गर्भाशयाच्या आतील अस्तरातील पेशी वाढू लागतात. त्यामुळे काहींना वेदना जाणवतात. तर काही महिलांना सतत त्रास होऊन दैनंदिन आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. यासोबत ओव्हेरियन सिस्ट असल्यास परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते.
एंडोमेट्रिओसिससोबत ओव्हेरियन सिस्ट असेल तर महिलांना कोणती लक्षणं दिसून येतात ते पाहूयात.
एंडोमेट्रिओसिसमध्ये सुरुवातीला थोडा पेल्विक पेन जाणवतो. पण ही वेदना वाढत असेल आणि सतत राहात असेल तर सिस्टचा आकार मोठा होत असल्याचा इशारा असू शकतो. मासिक पाळीदरम्यान, लैंगिक संबंधांवेळी किंवा सामान्य हालचाली करतानाही वेदना होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
एंडोमेट्रिओमा साधारणपणे हळूहळू वाढतो. मात्र सिस्टचा आकार वेगाने वाढू लागला तर पोटात वजन वाटणं आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते. काही वेळा ओव्हेरियन टॉर्शन अशी आपत्कालीन स्थितीही निर्माण होऊ शकते.
उपचार न केल्यास एंडोमेट्रिओसिस अंडाशयाच्या टिश्यूंना हानी पोहोचवू शकतो. यामुळे महिलांच्या हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होतं. त्यामुळे गर्भधारणा होण्यास अडचण येऊ शकते.
अतिरिक्त रक्तस्राव, अनियमित पाळी किंवा वेदनादायक पाळी ही लक्षणं वाढत असतील, तर आजार गंभीर होत असल्याचे संकेत असू शकतात. यामुळे हार्मोनल असंतुलन किंवा इतर समस्या असल्याची शक्यता असते.
पोटाच्या खालच्या भागात अचानक तीव्र वेदना जाणवत असेल तर सिस्ट फुटण्याची समस्या जाणवू शकते. ही आपत्कालीन परिस्थिती असून तात्काळ डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.