Heart disease: जॅम-च्युइंग गम खाताय? मग सावधान! ‘या’ स्वीटनरमुळे हार्ट अटॅक-स्ट्रोकचा धोका?

Low calorie sweetener: जाइलिटोलच्या रक्तातील अधिक प्रमाणाचा हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि मृत्यूच्या वाढलेल्या धोक्याशी संबंध असल्याचं अभ्यासात आढळलं. मात्र जाइलिटोलमुळेच हे आजार होतात, असं सिद्ध झालेलं नाही. 17,710 लोकांच्या संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष जाणून घ्या.
Heart disease
Heart diseasesaam tv
Published On: 

तुम्ही जॅम किंवा च्युइंग गम खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जॅम आणि च्युइंग गमसह अनेक गोड पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जाइलिटोल (Xylitol) या स्वीटनरबाबत एका अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आलीये. रक्तातील जाइलिटोलचं प्रमाण जास्त असलेल्या लोकांमध्ये पुढील काही वर्षांत हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक आणि मृत्यूचा धोका जास्त असल्याचं या अभ्यासात आढळून आले आहे.

या अभ्यासात तब्बल 17,710 लोकांचा समावेश करण्यात आला होता. या संशोधनाचे निष्कर्ष म्यूनिखमध्ये झालेल्या युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी (ESC)च्या वार्षिक परिषदेत मांडण्यात आले. ही जगातील मोठ्या हदयाच्या आरोग्याबाबतची परिषदांपैकी एक आहे.

जाइलिटोल म्हणजे काय?

जाइलिटोल हे एक प्रकारचा स्वीटनर आहे. म्हणजेच पदार्थ गोड करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हा एक शुगर अल्कोहोल असून त्याची चव साखरेसारखीच असते. मात्र सामान्य साखरेच्या तुलनेत त्यामध्ये कॅलरी कमी असतात. त्यामुळे कमी कॅलरी असलेला पर्याय म्हणून जाइलिटोलचा वापर अनेक गोड पदार्थांमध्ये केला जातो. जैम, च्युइंग गम आणि इतर काही खाण्याच्या पदार्थांमध्ये ते वेगवेगळ्या प्रमाणात वापरले जाते.

जाइलिटोलचा आणखी एक फायदा म्हणजे तोंडातील काही बॅक्टेरिया त्याचं पचन करू शकत नाहीत. त्यामुळे या बॅक्टेरियांची संख्या कमी होण्यास मदत होते आणि दातांना कीड लागण्याचा धोका कमी होऊ शकतो. याच कारणामुळे च्युइंग गमसारख्या पदार्थांमध्येही जाइलिटोलचा वापर केला जातो.

17 हजारांहून अधिक लोकांवर झाला स्टडी

या संशोधनासाठी 17,710 लोकांचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी त्यांच्या रक्तातील जाइलिटोलचे प्रमाण तपासले. यानंतर रक्तात जाइलिटोलचं प्रमाण सर्वाधिक असलेल्या 25 टक्के लोकांची तुलना सर्वात कमी प्रमाण असलेल्या लोकांशी करण्यात आली. या तुलनेत एक महत्त्वाची बाब समोर आली. रक्तात जाइलिटोलचं प्रमाण जास्त असलेल्या लोकांमध्ये पुढील सहा वर्षांत मृत्यू, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका 57 टक्क्यांनी जास्त असल्याचं आढळलं. इतकंच नाही तर रक्तातील जाइलिटोलचं प्रमाण जितकं जास्त, तितका हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका अधिक असल्याचंही संशोधनातून दिसून आलं.

मग जाम आणि च्युइंग गम खाल्ल्याने हार्ट अटॅक येतो का?

जाइलिटोल थेट हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक घडवून आणतो, असं या संशोधनातून सिद्ध झालेलं नाही. याचं कारण म्हणजे हे संशोधन ऑब्झर्वेशनल स्टडी आहे. म्हणजे संशोधकांनी लोकांच्या शरीरातील जाइलिटोलचं प्रमाण आणि त्यांच्या आरोग्यावर झालेले परिणाम यांचा संबंध पाहिला. त्यामुळे जाइलिटोलमुळेच हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक झाला, असा थेट निष्कर्ष या अभ्यासातून काढता येत नाही.

Heart disease
Poha for diabetes: पोहे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का? डायबिटीजच्या रुग्णांनी खावे की टाळावे? AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलं सत्य

याबाबत द गार्डियनच्या रिपोर्टमध्येही स्पष्ट करण्यात आलंय की, जाइलिटोल थेट हार्ट अटॅकचं कारण ठरतो, असं सध्या म्हणता येणार नाही.

आर्टिफिशियल स्वीटनरबाबत पुन्हा चर्चा

जाइलिटोलसारख्या स्वीटनरचा वापर अनेक खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. कमी कॅलरी असल्यामुळे अनेकांना असे पदार्थ सामान्य साखरेपेक्षा अधिक आरोग्यदायी वाटतात. पण या अभ्यासामुळे अशा स्वीटनरच्या वापराबाबत पुन्हा चर्चा सुरू झालीये. कारण काही लोक कमी कॅलरी आहे म्हणून अशा पदार्थांचं सेवन गरजेपेक्षा जास्त करू शकतात.

ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ डेल स्टॅनफोर्ड यांनी सांगितलं की, हृदयाशी संबंधित आरोग्याचा धोका हळूहळू वाढत जातो. त्यामुळे आपण रोज खात असलेल्या आणि पित असलेल्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांचा त्यावर काही परिणाम होतो का, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

त्यांच्या मते, जाइलिटोलसारखे आर्टिफिशियल स्वीटनर अनेक खाद्यपदार्थांमध्ये आढळतात. लोक अनेकदा हे पदार्थ आरोग्यासाठी चांगले आहेत असं समजून त्यांचं सेवन जास्त करतात. त्यामुळे आर्टिफिशियल स्वीटनरचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असं सांगणाऱ्या उपलब्ध पुराव्यांमध्ये या अभ्यासाचीही भर पडते.

Heart disease
Healthy weight loss: जीम, डाएट करूनही वजन कमी होत नाहीये? आजपासूनच रात्रीच्या जेवणानंतर करा 5 गोष्टी

जाइलिटोल पूर्णपणे बंद करायचे का?

या एका अभ्यासाच्या आधारावर जाइलिटोल असलेले पदार्थ पूर्णपणे बंद करावेत, असा निष्कर्ष काढता येत नाही. कारण या अभ्यासातून जाइलिटोल आणि हार्ट अटॅक धोका यांच्यात संबंध दिसून आला आहे. मात्र जाइलिटोलमुळेच हा धोका निर्माण होतो, हे सिद्ध झालेलं नाही.

मात्र जाइलिटोल किंवा इतर आर्टिफिशियल स्वीटनर असलेले पदार्थ गरजेपेक्षा जास्त प्रमाणात घेणं टाळणं महत्त्वाचं आहे. एखादा पदार्थ कमी कॅलरीचा आहे म्हणून तो कितीही प्रमाणात खाल्ला तरी चालतो, असं समजणं योग्य नाही.

Heart disease
Liver Transplant Signs: लिव्हर फेल होत असल्याचे ‘हे’ संकेत वेळीच ओळखा; जाणून घ्या ट्रान्सप्लांटची वेळ आलीय का?

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com