

बाजारात केळी खरेदी करताना अनेक जण आधी त्यांचा रंग पाहतात. पिवळी, ताजी आणि डाग नसलेली केळी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. केळी काळी पडलेली किंवा जास्त पिकलेली असतील, तर ती घेणं अनेक जण टाळतात. एवढंच नाही, तर घरात आणलेली केळी काळी पडू लागली की ती थेट कचऱ्याच्या डब्यात फेकली जातात.
मात्र, जास्त पिकलेल्या केळ्यांबाबत एक महत्त्वाची गोष्ट समोर आलीये. ही माहिती वाचून तुम्हालाही मोठा धक्का बसू शकतो. या केळ्यांमध्ये असलेल्या काही नैसर्गिक घटकांचा प्रयोगशाळेत कॅन्सरच्या पेशींवर परिणाम दिसून आल्याचं संशोधनात म्हटलंय. मात्र याचा अर्थ जास्त पिकलेली केळी खाल्ल्याने कॅन्सर बरा होतो असा अजिबात नाही.
जपानी संशोधक एम. शिमिझू आणि त्यांच्या टीमने 'Banana Extracts and Biological Activity Research' या असा अभ्यास केला. या संशोधनात केळी जास्त पिकल्यावर त्यांच्यात नेमके काय बदल होतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. केळी जास्त पिकल्यावर त्यांच्या सालीवर गडद तपकिरी किंवा काळे डाग दिसू लागतात. या काळात केळ्यांमध्ये काही नैसर्गिक घटकांचं प्रमाण वाढू शकतं. या घटकांना बायोॲक्टिव्ह कंपाउंड असं म्हणतात.
प्रयोगशाळेत केलेल्या काही चाचण्यांमध्ये या घटकांचा कॅन्सरच्या पेशींच्या वाढीवर परिणाम दिसून आल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे जास्त पिकलेल्या केळ्यांमधील घटकांचा पुढील अभ्यास करण्याची गरज असल्याचं देखील महत्त्वाचं आहे.
या संशोधनासंदर्भात आणखी एक महत्त्वाचा दावा केला जातो. कॅन्सरच्या पेशींवर परिणाम करणाऱ्या काही घटकांचा निरोगी पेशींवर तुलनेने कमी परिणाम दिसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या घटकांचा कॅन्सरवरील संभाव्य उपयोग तपासण्याची संशोधकांना उत्सुकता आहे. मात्र प्रयोगशाळेत पेशींवर केलेल्या चाचण्या आणि माणसांच्या शरीरावर होणारे परिणाम यामध्ये मोठा फरक असू शकतो.
त्यामुळे केवळ जास्त पिकलेली केळी खाल्ल्याने कॅन्सर टाळता येतो किंवा त्यावर उपचार करता येतात, असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरणार आहे. यासाठी अधिक संशोधन आणि ठोस पुरावे आवश्यक आहेत.
केळी कमी-अधिक पिकलेली असली तरी ती पोषक घटकांचा चांगला स्रोत आहेत. केळ्यांमधून शरीराला पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन बी६ आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात.
पचनासाठी फायदेशीर- केळ्यांमधील फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.
शरीराला ऊर्जा मिळते- केळ्यांमध्ये नैसर्गिक साखर आणि कर्बोदकं असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.
पोटॅशियमचा चांगला स्रोत- केळ्यांमधील पोटॅशियम स्नायूंचं काम आणि शरीरातील द्रवांचं संतुलन राखण्यासाठी उपयोगी ठरतं.
व्हिटॅमिन बी६ मिळतं- शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांसाठी व्हिटॅमिन बी६ आवश्यक असतं.
अँटिऑक्सिडंट्सचा फायदा- केळ्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीरातील पेशींना होणाऱ्या काही प्रकारच्या नुकसानीपासून संरक्षण मिळवून देण्यात मदत करतात.
केळी जास्त पिकल्यावर त्यांची साल काळी पडू शकते. मात्र, केवळ काळे डाग दिसत आहेत म्हणून केळी खराब झाली आहेत असं म्हणता येत नाही. केळीचा गर व्यवस्थित असेल आणि त्याला कुजल्यासारखा वास येत नसेल तर ती खाण्यायोग्य असू शकतात.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.