Drinking water quality: पाणी स्वच्छ दिसतंय म्हणून निर्धास्त राहू नका; तुमच्या घरच्या पाण्यात हे धोकादायक घटक असू शकतात!

Safe drinking water: पाणी स्वच्छ दिसतंय म्हणजे ते सुरक्षित आहेच असं नाही. TDS, pH, सूक्ष्मजीव, जड धातू आणि इतर दूषित घटकांची माहिती घेणं महत्त्वाचं आहे. घरातील पाण्याचा स्रोत आणि गुणवत्ता समजून योग्य शुद्धीकरण तंत्रज्ञान निवडा.
water
watersaam tv
Published On

पाणी आपल्या आयुष्यातील सर्वात गरजेच्या गोष्टींपैकी एक आहे. तहान भागवण्यापासून शरीराचं आरोग्य टिकवण्यापर्यंत पाण्याची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र आपण दररोज पीत असलेलं पाणी खरंच सुरक्षित आहे का, याचा विचार अनेकदा केला जात नाही. पाणी स्वच्छ दिसतं, त्याला वास येत नाही किंवा चवही सामान्य असते, त्यामुळे ते शुद्ध आणि सुरक्षित आहे, असा अनेकांचा समज असतो. मात्र, केवळ दिसण्यावरून पाण्याची गुणवत्ता ठरवता येत नाही.

पाण्यात विरघळलेली अनेक खनिजे, क्षार, सूक्ष्मजीव, जड धातू, कीटकनाशके आणि इतर प्रदूषक डोळ्यांना दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय जल गुणवत्ता महिन्याच्या निमित्ताने आपल्या घरात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. याबाबत डॉ. अनिल कुमार, मुख्य जल वैज्ञानिक, युरेका फोर्ब्स लि. यांनी पाण्याची गुणवत्ता तपासताना केवळ त्याचा रंग, चव किंवा TDSचा आकडा पाहणं पुरेसं नसल्याचं स्पष्ट केलंय.

TDS म्हणजे काय?

पाण्याबद्दल चर्चा करताना TDS हा शब्द नेहमी ऐकायला मिळतो. TDS म्हणजे Total Dissolved Solids, म्हणजेच पाण्यात विरघळलेली खनिजे, क्षार आणि इतर अजैविक पदार्थांचे एकूण प्रमाण. TDSचा पाण्याच्या चवीवर परिणाम होतो. मात्र, पाणी पिण्यास सुरक्षित आहे की नाही, हे ठरवण्यासाठी केवळ TDSचा आकडा पुरेसा नाही.

water
Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

“TDSची पातळी कमी आहे म्हणजे पाणी पूर्णपणे सुरक्षित आहे, असे मानता येत नाही. त्याचप्रमाणे TDS जास्त आहे म्हणजे पाणी खराब आहे, असेही नाही. TDSमध्ये नेमके कोणते घटक आहेत, हे समजून घेणे आणि पाण्याच्या स्रोत व गुणवत्तेनुसार योग्य शुद्धीकरण प्रक्रिया निवडणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे डॉ. अनिल कुमार सांगतात.

म्हणजेच TDSचा आकडा पाहून पाण्याबाबत अंतिम निष्कर्ष काढण्याऐवजी त्यातील घटक आणि पाण्याचा स्रोत समजून घेणे गरजेचे आहे.

pH पातळीही महत्त्वाची

पाणी आम्लधर्मी, उदासीन किंवा अल्कधर्मी आहे, हे pH पातळीवरून समजतं. पिण्याच्या पाण्यासाठी ठरवलेल्या मानकांनुसार त्याची pH पातळी स्वीकारार्ह मर्यादेत असणं आवश्यक आहे.

पाणी खूप आम्लधर्मी किंवा खूप अल्कधर्मी असल्यास त्याच्या चवीवर परिणाम होऊ शकतो. तसेच कालांतराने पाईपमध्ये गंज किंवा झीज होण्याची शक्यता असते. काही शुद्धीकरण प्रक्रियांच्या कार्यक्षमतेवरही pHचा परिणाम होऊ शकतो.

मात्र, pH योग्य आहे म्हणून पाणी पूर्णपणे सुरक्षित आहे, असेही म्हणता येत नाही. पाण्याची एकूण गुणवत्ता समजून घेण्यासाठी pH हा महत्त्वाचा घटक आहे.

पाणी स्वच्छ दिसतंय म्हणजे ते शुद्ध आहेच असं नाही

पाण्याबाबतचा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे “पाणी स्वच्छ दिसतंय म्हणजे ते सुरक्षित आहे.” प्रत्यक्षात हे नेहमीच खरं नसतं. जीवाणू, विषाणू, विरघळलेले जड धातू, कीटकनाशके आणि औद्योगिक प्रदूषक यांसारखे अनेक घटक पाण्यात असू शकतात. विशेष म्हणजे हे घटक दिसत नाहीत. त्यांची उपस्थिती फक्त पाण्याचा रंग, वास किंवा चव पाहून ओळखता येत नाही.

जुन्या पाईपलाईन, भूजलातील प्रदूषण, शेतीतून वाहून येणारे पाणी किंवा पाण्यावर पुरेशी प्रक्रिया न झाल्यामुळे हे दूषित घटक पिण्याच्या पाण्यात पोहोचू शकतात

water
Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांचा संसर्ग झपाट्याने वाढतोय; ऑफिसमध्ये काम करताना ‘या’ चुका करणं टाळा

“पाणी दिसायला स्वच्छ आहे, त्याला वास येत नाही किंवा त्याची चव सामान्य आहे, यावरून ते सुरक्षित असल्याचे ठरवता येत नाही. अनेक हानिकारक घटक पूर्णपणे अदृश्य असतात. त्यामुळे केवळ डोळ्यांनी पाण्याची गुणवत्ता तपासणे पुरेसे नाही,” असे डॉ. अनिल कुमार स्पष्ट करतात.

पावसाळ्यात सूक्ष्मजीवांच्या प्रदूषणाचा धोका

जीवाणू, विषाणू आणि प्रोटोझोआसारखे सूक्ष्मजीव हे पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमुख कारण ठरू शकतात. विशेषतः पावसाळ्यात पाण्याच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. पूरस्थिती, तुडुंब भरलेले नाले आणि पाणीपुरवठा यंत्रणेत होणारे बदल यामुळे पाण्याच्या स्रोतामध्ये सूक्ष्मजीव मिसळण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे पावसाळ्यात किंवा पाण्याच्या स्रोताच्या गुणवत्तेत बदल होत असताना प्रभावी शुद्धीकरण करणे महत्त्वाचे ठरते.

वर्षभर पाण्याची गुणवत्ता सारखीच राहत नाही

आपल्या घरात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता वर्षभर एकसारखी असेलच असे नाही. ऋतुमानातील बदल, मुसळधार पाऊस, पाणीपुरवठा यंत्रणेतील दुरुस्ती, जुन्या पाईपलाईन, परिसरातील बांधकाम किंवा महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या स्रोतामध्ये झालेला बदल याचा पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एकदा पाणी चांगले असल्याचे आढळले म्हणून ते वर्षभर तसंच राहील, असं गृहीत धरणं योग्य नाही. घरात येणाऱ्या पाण्यात होणाऱ्या बदलांबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे.

प्रत्येक घरासाठी एकच वॉटर प्युरिफायर योग्य नसतो

वॉटर प्युरिफायर घेताना फक्त ब्रँड किंवा किंमत पाहणे पुरेसे नाही. प्रत्येक घरातील पाण्याची परिस्थिती वेगळी असू शकते. पाण्याचा स्रोत कोणता आहे, TDS किती आहे, सूक्ष्मजीवांचे प्रदूषण आहे का, तसेच पाण्यात इतर कोणत्या विरघळलेल्या अशुद्धी आहेत, यावर कोणते शुद्धीकरण तंत्रज्ञान योग्य ठरेल हे ठरते.

“पाणी शुद्ध करण्यासाठी सर्व घरांना एकच तंत्रज्ञान योग्य ठरेल असे नाही. पाण्याचा स्रोत, TDSची पातळी, सूक्ष्मजीवांचे संभाव्य प्रदूषण आणि इतर विरघळलेल्या अशुद्धी लक्षात घेऊन योग्य शुद्धीकरण तंत्रज्ञान निवडणे गरजेचे आहे,” असे डॉ. अनिल कुमार सांगतात.

water
Breathing difficulty: 2-3 महिन्यांपासून सुरू होता श्वासाचा त्रास; डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कोपी केली अन् समोर आलं धक्कादायक कारण

म्हणूनच केवळ जाहिरात, ब्रँड किंवा किंमत पाहून प्युरिफायर निवडण्यापेक्षा आपल्या घरातील पाण्याची गुणवत्ता समजून घेणे महत्त्वाचे आहे.

पाणी शुद्ध करण्याचं तंत्रज्ञानही बदलतंय

पाण्याच्या गुणवत्तेशी संबंधित आव्हाने दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीची होत आहेत. त्यामुळे पारंपरिक गाळणी प्रक्रियेतून काढता न येणाऱ्या काही प्रदूषकांवर काम करण्यासाठी पाणी शुद्धीकरणाचे तंत्रज्ञानही सतत विकसित होत आहे. यामध्ये नॅनोपोर फिल्ट्रेशन टेक्नॉलॉजी ही एक आधुनिक पद्धत आहे. युरेका फोर्ब्सच्या अॅक्वागार्ड वॉटर प्युरिफायरच्या नवीन श्रेणीमध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

नॅनोमीटर पातळीवरील अतिशय बारीक छिद्रांचा वापर करणारे हे तंत्रज्ञान अतिसूक्ष्म दूषित घटकांना लक्ष्य करण्यास मदत करते. त्यामुळे पाणी शुद्धीकरणाला अतिरिक्त स्तर मिळतो. आज पाण्याच्या गुणवत्तेसमोर असलेली आव्हाने अधिक जटिल होत असताना, अशा आधुनिक शुद्धीकरण तंत्रज्ञानाची गरजही वाढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com