Health Care Tips: तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर उजव्या बाजूला दुखतंय? 'या' गंभीर समस्येविषयी शरीर देत असलेले इशारे जाणून घ्या

Gallstone symptoms: वारंवार पोटदुखी, अपचन, पोट फुगणे किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर उजव्या बाजूला वेदना होत असतील तर ते पित्ताशयातील खड्यांचे संकेत असू शकतात. वेळेत अल्ट्रासाऊंड तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेतल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.
Health Care Tips
Health Care Tipssaam tv
Published On

आजकाल पित्ताशयात खडे (गॉलस्टोन्स) होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक रुग्ण तीव्र पोटदुखी किंवा इतर गंभीर गुंतागुंत आढळून आल्यानंतरच डॉक्टरांकडे धाव घेतात येतात. संतुलित आहाराचा अभाव, लठ्ठपणा, बैठी जीवनशैली, झपाट्याने वजन कमी होणे, मधुमेह आणि वाढते वय ही पित्ताशयात खडे होण्यामागची प्रमुख कारणं आहेत.

वारंवार होणारी पोटदुखी, पोट फुगणं किंवा अपचन यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच निदान आणि उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत तसंच आपत्कालीन शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Health Care Tips
Brain tumor symptoms: डोळ्यांना सतत धुरकट दिसतंय? चष्म्याची गरज समजून दुर्लक्ष करू नका, हे ब्रेन ट्युमरचं पहिलं गंभीर लक्षण असू शकतं

पित्ताशयात तयार होणारे कोलेस्ट्रॅाल, पित्तद्रव्ये आणि कॅल्शियमपासून खडे तयार होतात. बऱ्याचदा याची कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत. मात्र जेव्हा यामुळे पित्तवाहिनीत अडथळा निर्माण होऊ लागतो किंवा पित्ताशयाला सूज येते तेव्हा ही गंभीर समस्या उद्भवू शकते.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे जनरल सर्जन डॉ. नितीन भावे म्हणाले की, तेलकट किंवा पचायला जड अशा अन्नपदार्थांचं सेवन केल्यानंतर पोटाच्या उजव्या बाजूस वरच्या भागात वेदना होऊ लागतात हे पित्ताशयातील खड्यांचं महत्त्वाचं लक्षण आहे. ही वेदना पाठीत किंवा उजव्या खांद्यापर्यंत वाढू शकते आणि ती काही मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत टिकून राहू शकते. याशिवाय पोट फुगणे, मळमळ, उलट्या, अपचन किंवा जेवल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटणं अशी लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं अनेकदा अॅसिडिटी किंवा सामान्य पचनाच्या तक्रारी समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

डॉ. भावे पुढे म्हणाले की, पित्ताशयात खडे असलेल्या जवळपास ५० टक्के रुग्णांकडून सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं. दर महिन्याला ३० ते ७० वयोगटातील सुमारे ५० टक्के रुग्ण वारंवार होणारी पोटदुखी, पोट फुगणे आणि अपचनाच्या तक्रारींसह आमच्याकडे उपचारांसाठी येतात.

Health Care Tips
Bone Health: हाडं ठिसूळ किंवा कमकवूत झाली की शरीरात हे 5 मोठे बदल दिसून येतात

लक्षणं सुरू झाल्यानंतरही उपचार न घेतल्यास पित्ताशयाला सूज येणं (कोलेसिस्टायटिस), संसर्ग, पित्तवाहिनीतील अडथळा, कावीळ, स्वादुपिंडास सूज (पॅन्क्रियाटायटिस) किंवा पोटाचा गंभीर संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे वारंवार पोटदुखी होत असल्यास किंवा त्यासोबत ताप, डोळे किंवा त्वचा पिवळी पडणं, सतत उलट्या होणं किंवा तीव्र पोटदुखी अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पित्ताशयातील खड्यांचं निदान करण्यासाठी अल्ट्रासाऊंड ही सर्वात प्रभावी आणि प्राथमिक तपासणी आहे.

डॉ. भावे पुढे म्हणाले की, लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी लॅप्रोस्कोपिक पद्धतीने पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया हा सर्वोत्तम उपचार मानला जातो. या शस्त्रक्रियेमध्ये शरीरावर लहान छिद्र केले जातात. त्यामुळे वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, रुग्णाचा रुग्णालयातील कालावधी कमी होतो आणि रुग्ण लवकर बरा होतो.

Health Care Tips
Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

कसा कमी करू शकता धोका?

वजन नियंत्रित राखणं, फळे, भाज्या आणि तंतुमय पदार्थांचा समावेश असलेला संतुलित आहार घेणं, तेलकट पदार्थांचं अतिसेवन टाळणं, नियमित व्यायाम करणं आणि मधुमेह नियंत्रणात ठेवणं यामुळे गॉलस्टोन्सचा धोका कमी होऊ शकतो. मधुमेही आणि तरुणांमध्ये गुंतागुंतीची शक्यता अधिक असल्याने त्यांना लक्षणं नसली तरी काही वेळा शस्त्रक्रिया करणं गरजेचं असतं. पित्ताशयाला सूज येण्यापूर्वी शस्त्रक्रिया केल्यास ती अधिक सोपी होते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com