

यंदाही देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या दिवसांत घरोघरी दिवे,पणती आणि कंदीले लावले जातात. याबरोबर सगळीकडे आपल्याला आकर्षक सुंदर सजावट पाहायला मिळत आहे. या दरम्यान घरोघरी गोड पदार्थांचा फराळ बनवला जातो. दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. दिवाळीचा फराळ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडत असतो. त्यामुळे सध्या घरांघरामध्ये लाडू, चिवडा, चकली यांचा सुंदर घमघमाट सुटताना पाहायला मिळत आहे.
दिवाळीमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. पण दिवाळीमध्ये बेसनाचे लाडू हा गोड पदार्थ सर्वांना आवडत असतो. बेसनाचे लाडू म्हटले की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण खूश होतात. यामुळे अनेकांच्या घरी बेसनाचे लाडू बनवले जातात. यामध्ये काही महिलांना घरच्या घरी बेसनाचे लाडू बनवण्याची हौस असते. अशाच महिलांसाठी आम्ही घरच्या-घरी बनणाऱ्या बेसनाच्या लाडूची रेसिपी घेऊन आलो आहोत. बेसन लाडू रेसिपी अगदी सोपी असल्याने तुम्ही सहज बनवू शकता.
साहित्य
बेसनाचे पीठ
पीठी साखर
साजूक तूप
वेलचीपूड
ड्रायफ्रूट
बनवण्याची पद्धत
सर्व प्रथम गॅस ऑन करा. मग त्यावर कढई ठेवून त्यात साजूक तूप टाका. त्यानंतर त्या तुपात आवश्यकतेनुसार बेसनाचे पीठ टाकून घ्या. यानंतर या सर्व मिश्रणाला मंद आचेवर चांगले भाजून घ्या. कढईमधील बेसनाच्या पीठाचे सर्व मिश्रण हलवत राहणे खूप गरजेचे आहे. हे मिश्रण कढईला चिकटणार नाही, या गोष्टीची महिलांनी काळजी घ्यावी. बेसनाच्या पीठाला लालसर रंग आल्यावर गॅस बंद करावा.
यानंतर कढईमधील मिश्रणात वेलचीपूड टाकावी, आणि सर्व मिश्रण पुन्हा एकदा चांगले मिक्स करुन घ्यावे. यानंतर ते पीठ थोडेसे थंड झाल्यावर त्यात आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून मिक्स करुन घ्या. हे सर्व झाल्यावर त्या बेसनाच्या पीठामध्ये पीठी साखर टाकून, सर्व मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या. एकजीव केलेल्या मिश्रणाचे हव्या तश्या आकाराचे लाडू वळायला घ्या. अशा पद्धतीने सर्व लाडू तयार करुन घ्या. तुम्ही बेसनाच्या लाडूना पुन्हा ड्रायफ्रूटच्या साहाय्याने सजवू शकता.