

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण खाण्यापिण्याच्या बाबतीतले पत्थ्य पाळत नाही. त्यामुळे भविष्यात त्यांना जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागतं. काही आजार असे असतात, ज्यामध्ये तुम्हाला कायमचे सोडावेच लागतात. त्यातला महत्वाचा पदार्थ म्हणजे भात. अनेकांना डायबेटीजची लागण झाली की, भाताचा जवळपास त्यागच करावा लागतो. पण डायबेटीजच्या रुग्णांना खरंच भाताचा त्याग करणं महत्वाचं आहे का? किंवा तो खाण्याचे नियम कोणते हे जाणून घेणे महत्वाचे आहे. पुढील बातमीत आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
डायबेटीज म्हणजेच मधुमेह हा आजार आहे. यामध्ये तुमच्या शरीरातल्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं. त्यामुळे ते नियंत्रित ठेवणं गरजेचं असतो. अन्यथा तुम्हाला भविष्यात ह्रदयासंबंधीत गंभीर समस्यांना सामोरं जावं लागेल. आपण जे काही खातो-पितो त्या प्रत्येक गोष्टीचा थेट परिणाम ब्लड शुगरवर होतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहाराबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषतः भाताबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. डायबेटीस असताना भात खावा का? आणि खायचा असेल तर कसा? याच प्रश्नाचं उत्तर तज्ज्ञांनी पुढील माहितीत दिलं आहे.
प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट शिल्पा अरोरा यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांच्या मते, भात हा सगळ्यांच्या सवयीचा आणि आहारातला महत्वाचा पदार्थ आहे. त्यामुळे तुम्ही डायबेटीजचे रुग्ण असाल तरी भात खाऊ शकता. पण याचे काही नियम फॉलो करणं महत्वाचं आहे.
याने तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते. त्यासाठी तुम्ही भातात थोडं तूप मिक्स करुन खावं. याने साखरेची पातळी वाढण्याचा धोका कमी होऊ शकतो.
तूप भातामध्ये मिक्स केल्यावर रक्तातल्या साखरेचे प्रमाण तीन वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रित राहण्यास मदत होते. भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळे तो खाल्ल्यानंतर साखर लगेच वाढते. पण तूप मिक्स केल्यावर हा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो आणि साखर हळूहळू वाढते. तसेच तूप पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं, ज्यामुळे शरीरात साखरेचं शोषण नियंत्रित होतं. तूपामध्ये ओमेगा-३ सारखी चांगली फॅटी अॅसिड्स असतात, जी पोट जास्त वेळ भरल्यासारखं ठेवतात. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अनावश्यक खाणं टाळता येतं. यानेच ब्लड शुगर लेव्हल स्थिर राहण्यास मदत होते.
सूचना: हा लेख केवळ सामान्य माहिती देण्यासाठी आहे. कोणताही आहार बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.