

सकाळच्या नाश्त्याला रोज पोहे, उपमा किंवा बेसनाचा पराठा खाऊन कंटाळा आला असेल तर यावेळी काहीतरी नवीन आणि चटपटीत पदार्थ नक्की ट्राय करा. रवा आणि बटाटा वापरून तुम्ही घरच्या घरी झटपट कुरकुरीत पराठा किंवा चिला बनवू शकता. हा चिला बाहेरून हलका कुरकुरीत, तर आतून मऊ आणि चवीला एकदम चटपटीत लागतो. विशेष म्हणजे हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारे साहित्य सहज घरात उपलब्ध असतं. चला जाणून घेऊयात रवा-बटाटा पराठा बनवण्याची रेसिपी.
१ कप रवा
अर्धा कप दही
२ मध्यम आकाराचे बटाटे
१ बारीक चिरलेला कांदा
१ चमचा किसलेले आले
२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
२ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा गरम मसाला
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा धणेपूड
चवीनुसार मीठ
पाणी आणि तेल
सर्वप्रथम मिश्रण तयार करा: बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्या. त्यानंतर ते किसून एका मोठ्या भांड्यात घ्या. त्यामध्ये रवा आणि दही घालून व्यवस्थित एकत्र करा. आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण १५ मिनिटे झाकून ठेवा.
मसाले मिसळा: १५ मिनिटांनंतर या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, किसलेले आले आणि कोथिंबीर घाला. त्यानंतर हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड आणि मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा. मिश्रण जास्त घट्ट वाटल्यास थोडे पाणी घाला.
तव्यावर चिला भाजून घ्या: गॅसवर तवा गरम करून त्यावर थोडे तेल सोडा. तयार मिश्रण मोठ्या चमच्याने तव्यावर टाकून गोलाकार पसरवा. चिल्याच्या कडांना थोडे तेल सोडा आणि मंद ते मध्यम आचेवर भाजून घ्या.
दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा: चिल्याची खालची बाजू सोनेरी झाल्यानंतर तो अलगद पलटवा. दुसरी बाजूही छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. अशाच प्रकारे उर्वरित मिश्रणाचे चिले तयार करा.
तयार झालेला रवा-बटाटा चिला गरमागरम सर्व्ह करा. त्यासोबत हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दही दिल्यास त्याची चव आणखी वाढते. सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच संध्याकाळच्या भुकेसाठीही हा एक चविष्ट पर्याय ठरू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.