

सणासुदीचे दिवस म्हटलं की घराघरांत मिठाईची रेलचेल असते. काजू कतली, लाडू आणि वेगवेगळ्या पारंपरिक मिठाईंचा आस्वाद घेतला जातो. पण मधुमेह असलेल्या लोकांसाठी मिठाई खाताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकजण पांढऱ्या साखरेऐवजी गूळ किंवा खजूर वापरून बनवलेली मिठाई आरोग्यासाठी चांगली समजतात. तर काहीजण शुगर-फ्री मिठाईला सुरक्षित पर्याय मानतात. पण या सर्व पदार्थांमुळेही रक्तातील साखर वाढू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
डॉ. मोहन डायबेटिस स्पेशालिटीज सेंटरमधील पोषणतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ उमाशक्ती यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिलीये. त्यांच्या मते गूळ नैसर्गिक असल्यामुळे तो आरोग्यासाठी चांगला असतो, असा अनेकांचा समज आहे. गुळामध्ये काही खनिजे असली तरी त्यातील बहुतांश भाग साखरेचा असतो. त्यामुळे गूळ खाल्ल्यानेही रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू शकते. पांढऱ्या साखरेऐवजी गूळ वापरला म्हणून मिठाई मधुमेही रुग्णांसाठी सुरक्षित होत नाही.
खजूर हा नैसर्गिक गोडव्याचा चांगला स्रोत मानला जातो. त्यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे पोषक घटक असतात. परंतु खजुरात नैसर्गिक साखर आणि कर्बोदकांचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे जास्त प्रमाणात खजूर खाल्ल्यास रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच मधुमेही रुग्णांनी खजूरही मर्यादित प्रमाणात खाणं आवश्यक आहे.
अनेकजण साखर टाळण्यासाठी शुगर-फ्री मिठाई खरेदी करतात. अशा मिठाईंमध्ये स्टीव्हिया किंवा सुक्रालोजसारख्या साखरेच्या पर्यायांचा वापर केला जातो. या पर्यायांचा रक्तातील साखरेवर तुलनेने कमी परिणाम होऊ शकतो. मात्र मिठाई बनवताना वापरला जाणारा मावा, सुकामेवा, मैदा, क्रीम आणि तूप यामुळे त्यातील कॅलरी, चरबी आणि कर्बोदकांचं प्रमाण वाढू शकतं.
त्याचप्रमाणे काही शुगर-फ्री मिठाईंमध्ये माल्टिटॉलसारख्या शुगर अल्कोहोलचा वापर केला जातो. याचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतात. त्यामुळे केवळ मिठाईच्या पाकिटावर शुगर-फ्री असं लिहिलं आहे म्हणून ती जास्त प्रमाणात खाणं योग्य नाही.
उमाशक्ती यांच्या मते, मधुमेही रुग्णांनी मिठाई खरेदी करताना केवळ शुगर-फ्री हे लेबल पाहू नये. त्याऐवजी मिठाईमध्ये एकूण किती कर्बोदके आणि कॅलरी आहेत, याचीही माहिती घ्यावी.
मधुमेह आहे म्हणून सणासुदीच्या काळात गोड पदार्थ पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. पण आपल्या आवडीची मिठाई खाताना तिचं प्रमाण मर्यादित ठेवणं महत्त्वाचं आहे. जेवणाच्या वेळा नियमित पाळाव्यात आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधं वेळेवर घ्यावीत.
यासोबतच नियमित शारीरिक हालचाल करणं आणि रक्तातील साखरेची तपासणी करणंही गरजेचं आहे. गूळ, खजूर किंवा शुगर-फ्री मिठाई हे पदार्थ कितीही चांगले वाटले तरी ते कितीही प्रमाणात खाऊ शकतो असं नाही. त्यामुळे सणांचा आनंद घेताना खाण्यापिण्याचा समतोल राखणं हाच मधुमेही रुग्णांसाठी योग्य मार्ग आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.