

अनेक वर्षे सिगारेट ओढल्यानंतर आता धूम्रपान सोडून काय फायदा होणार असा विचार अनेक जण करतात. इतकी वर्षे धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांचं नुकसान झालंय ते आता भरून निघणार नाही, असंही अनेकांना वाटतं. मात्र हा समज चुकीचा आहे. धूम्रपान सोडण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. धूम्रपान सोडल्यानंतर फुफ्फुसांची हळूहळू सुधारणा होऊ लागते. तसंच, फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोकाही कालांतराने कमी होऊ शकतो. पण हा धोका कमी होण्यासाठी किती वेळ लागतो? धूम्रपान सोडल्यानंतर कोणती काळजी घ्यावी? जाणून घेऊया.
अनेक वर्षे धूम्रपान केल्यानंतर आता ते सोडण्यात काहीच अर्थ नाही, असं अनेकांना वाटतं. मात्र, प्रत्यक्षात असं नाही. धूम्रपान सोडल्यानंतर शरीरात हळूहळू चांगले बदल होऊ लागतात. फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका लगेच संपत नसला, तरी काही वर्षांनंतर तो कमी होण्यास मदत होते.
मुंबईतील एसएसओ कॅन्सर हॉस्पिटलमधील हेड अँड नेक कॅन्सर सर्जन डॉ. अमित चक्रवर्ती म्हणाले की, भविष्यात फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका कमी करायचा असेल, तर धूम्रपान सोडणं हे सर्वांत महत्त्वाचं पाऊल आहे. मात्र त्याचा परिणाम दिसण्यासाठी वेळ लागतो. एखाद्या व्यक्तीने किती वर्षे धूम्रपान केले, दिवसाला किती सिगारेट ओढल्या आणि धूम्रपान कधी सोडले, या गोष्टींवर कॅन्सरचा धोका किती कमी होईल हे अवलंबून असते.
अनेक वर्षे धूम्रपान केलेल्या व्यक्तीला धूम्रपान कधीही न केलेल्या व्यक्तीच्या तुलनेत फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असू शकतो. मात्र धूम्रपान सोडल्यामुळे तंबाखूमधील कॅन्सरल कारणीभूत ठरणाऱ्या घातक रसायनांचा शरीरावर होणारा पुढील परिणाम कमी होण्यास मदत होते. त्यामुळे कालांतराने कर्करोगाचा धोकाही कमी होऊ शकतो.
धूम्रपान थांबवल्यानंतर फुफ्फुसांची हळूहळू सुधारणा होऊ लागते. सिगारेटच्या धुरामुळे फुफ्फुसांमध्ये होणारी जळजळ आणि सूज कमी होऊ शकते. तसंच, श्वसनमार्गातील कफ आणि धुळीचे बारीक कण बाहेर काढण्यास मदत करणाऱ्या केसांसारख्या सूक्ष्म रचनांचे कामही सुधारू लागते. या रचनांना 'सिलिया' असे म्हणतात.
सिलिया व्यवस्थित काम करू लागल्यामुळे फुफ्फुसांमधील कफ आणि इतर सूक्ष्म कण बाहेर टाकणं सोपं होतं. त्यामुळे सतत खोकला येणे आणि धाप लागणे यांसारख्या त्रासांमध्येही अनेकांना आराम मिळू शकतो.
धूम्रपान सोडल्यानंतर फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका नेमका कधी धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीइतका होईल, हे निश्चितपणे सांगता येत नाही. हा धोका कमी होण्याची प्रक्रिया अनेक वर्षे सुरू राहू शकते.
ज्या व्यक्ती लवकर धूम्रपान सोडतात, त्यांना तुलनेने अधिक फायदा होऊ शकतो. कारण त्यांच्या शरीराचा सिगारेटच्या धुराशी कमी काळ संपर्क येतो. याशिवाय, एखाद्या व्यक्तीने आयुष्यभरात किती धूम्रपान केले आहे, याचाही कर्करोगाच्या धोक्यावर परिणाम होतो.
धूम्रपान सोडलं म्हणजे आता डॉक्टरांकडे जाण्याची किंवा वैद्यकीय तपासणी करण्याची गरज नाही, असं समजू नये. पूर्वी धूम्रपान केलेल्या काही व्यक्तींना फुफ्फुसांच्या कॅन्सरची तपासणी करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
ही तपासणी करायची की नाही, हे व्यक्तीचे वय, किती वर्षे धूम्रपान केले, दिवसाला किती सिगारेट ओढल्या आणि सध्या किंवा पूर्वी धूम्रपानाची सवय होती का, या गोष्टींवर अवलंबून असते. यासाठी कमी प्रमाणातील किरणोत्सर्ग वापरून केली जाणारी सीटी स्कॅन तपासणी (लो-डोस सीटी) उपयोगी ठरू शकते.
धूम्रपान सोडल्यानंतरही काही लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. सतत खोकला येणं, खोकल्यातून रक्त पडणं, कोणतंही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होणं, छातीत दुखणं किंवा बराच काळ धाप लागणं अशी लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही लक्षणे दिसल्यास तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.