Anemia Disease : ९० टक्के तरुणी, मुलांनामध्ये लोहाची कमतरता, कशी घ्याल काळजी? डॉक्टरांनी दिला सल्ला
Anemia Symptoms :
तरुण वयोगटातील ९०% महिलांमध्ये लोहाची कमतरता आढळून येते. बऱ्याच महिला याकडे दुर्लक्ष करतात. रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे थकवा आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसून येतात.
५० ते ६० टक्के गरोदर स्त्रिया (Women) देखील लोहाच्या कमतरतेने ग्रस्त आहेत, हिमोग्लोबिनची पातळी कमी होणे, अशक्तपणा आणि त्याच्याशी संबंधित लक्षणे जसे की श्वासोच्छवासात अडथळे निर्माण होणे आणि त्वचेवर फिकट रंगाचे डाग पडणे. ही स्थिती केवळ मातांसाठीच नाही तर त्यांच्या न जन्मलेल्या बाळांनाही धोका निर्माण करते, ज्यामुळे मुदतपूर्व प्रसुतीची शक्यता वाढते आणि वजन कमी होते.
हे धोके कमी करण्यासाठी लोहाच्या कमतरतेचा वेळीच शोध घेणे आणि त्यानुसार उपचार करणे गरजेचे आहे. गर्भधारणेदरम्यान लोहाच्या कमतरतेची लक्षणे ओळखून, गर्भवती माता स्वतःसाठी आणि त्यांच्या बाळांच्या आरोग्यासाठी (Health) योग्य काळजी घेऊ शकतात. ज्यांना लोहाच्या कमतरतेचा धोका आहे त्यांचा जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी वेळीच निदान होणे आवश्यक आहे.
हिमोग्लोबिनसाठी लोह खूप महत्त्वाचे आहे. हिमोग्लोबिन आपल्या शरीराच्या विविध भागांपर्यंत प्राणवायू पोहोचवण्याचे काम करते, यामध्ये फुफ्फुसे, टिश्यू, मेंदू आणि स्नायू इत्यादींचा समावेश होतो. शरीरातील बहुतांश लोह हे लाल रक्तपेशींमध्ये असते. लोहाची कमतरता असेल तर अॅनिमिया होतो, त्यामुळे त्वचा फिकी, निस्तेज होते, चक्कर येते, श्वास नीट घेता येत नाही. गर्भवती महिलांना लोहाची कमतरता होण्याचा धोका अधिक असतो. त्यासाठी आपल्या आहाराच्या (Food) माध्यमातून पुरेशा प्रमाणात लोहाचे सेवन करणे गरजेचे आहे.
अपोलो डायग्नोस्टिक्सचे नॅशनल टेक्निकल हेड आणि मुख्य पॅथॉलॉजिस्ट डॉ. राजेश बेंद्रे म्हणाले की, तरुण महिलांमध्ये लोहाची कमतरता ही एक वाढती चिंता आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. सकस आणि पोषक आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करूनही ९०% तरुणींना आजही लोहाच्या कमतरते सारख्या समस्येचा सामना करावा लागतो. मासिक पाळीत रक्तस्राव कमी होणे, पोषक आहाराचे सेवन न करणे आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांवर अवलंबून राहणे यासह अनेक घटक या समस्येस कारणीभूत ठरतात. लोह समृध्द अन्न स्रोत आणि आहाराच्या गरजांबद्दल शिक्षणाचा अभाव समस्या वाढवतो.
गर्भवती महिलांमध्ये लोहाची कमतरता ही चिंताजनक बाब आहे ज्यामुळे गर्भधारणेसंबंधी गुंतागुंतीचा सामना करावा लागू शकतो. अशक्तपणा आणि थकवा यासारख्या जोखमींव्यतिरिक्त, गर्भधारणेदरम्यान लोहाची कमतरता हे देखील गर्भाच्या विकासात अडथळा आणू शकते.
गर्भवती मातांमध्ये लोहाची अपुरी पातळी ही मुदतपूर्व जन्म आणि कमी वजनाचे बाळ यासारख्या समस्येस कारणीभूत ठरते. ज्यामुळे बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर परिणाम होऊ शकतो. गरोदर महिलांमध्ये लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. डॉक्टर बेंद्रे सांगतात की, गर्भधारणेदरम्यान लोहाच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी महिलांना नियमित प्रसवपूर्व तपासणी करणे आवश्यक आहे.
लिलावती रुग्णालयातील हेमॅटोलॉजिस्ट डॉ. अभय भावे म्हणाले की, अॅनिमिया ही सर्वात व्यापक सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे. यामध्ये कामाचे वाढते तास, एकाग्रता कमी होणे आणि कमी आत्मविश्वास खालावणे तसेच दृष्टीदोषाची समस्या उद्भवते. गंभीर प्रकरणांमध्ये प्रसूतीच्या वेळी गर्भवती रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका वाढतो. विशेषत: ५० ते ६० टक्के गर्भवती महिलांमध्ये लोहाची कमतरता आढळून येते. आपल्या लोकसंख्येमध्ये अशक्तपणाचे प्रमाण अधिक आहे.
विशेषत: विद्यार्थी आणि तरुण वयोगट लोहाची कमतरता हे अशक्तपणाचे प्रमुख कारण ठरत आहे. पोषक आहाराची कमतरता किंवा आहाराच्या चुकीच्या सवयी, आतड्यांमध्ये कृमींचा प्रादुर्भाव आणि मासिक पाळी दरम्यान रक्तस्राव कमी होणे आदी घटकही यास कारणीभूत ठरतात. आतड्यांसबंधीत दुर्मिळ रोग किंवा मॅलॅबसॉर्प्शन सिंड्रोमसह टाळण्यासाठी विशेष उपचारांची आवश्यकता भासते.
अॅनिमियाची इतर कारणे आहेत जसे की व्हिटॅमिन बी १२ आणि फॉलीक ऍसिडची कमतरता. अॅनिमिया मुक्त भारत अशी खास मोहिम देखील राबविली जात असून अॅनिमिया म्हणजेच लोहाची कमतरता दूर करण्याचा यामागचा खास उद्देश आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेची निरीक्षणानुसार अॅनिमिया हा भारतीय महिला आणि मुलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या आजारांपैकी एक आहे. देशात ५० टक्क्यांपेक्षा जास्त स्त्रिया आणि मुले या आजाराने त्रस्त आहेत.
मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. केकिन गाला म्हणाले की, लोहाच्या कमतरतेची सर्वात महत्वाची लक्षणे म्हणजे थकवा आणि अशक्तपणा येणे. ही लोहाच्या कमतरतेची प्राथमिक लक्षणे आहेत. त्याचबरोबर महिलांनी त्यांच्या मासिक पाळीकडे लक्ष द्यावे जेणेकरुन वेळीच उरचार करणे शक्य होईल. संपूर्ण रक्त तपासणी (CBC) तसेच सीरम फेरीटिन आणि ट्रान्सफरिन सॅच्युरेशन हे शरीरातील लोह पातळी समजण्यास मदत करतात. या चाचण्यांद्वारे नियमित निरीक्षण केल्याने लोहाच्या कमतरतेमुळे भविष्यातील गुंतागुंतीस प्रतिबंध करता येते.
आयर्न सप्लिमेंट्स हा या उपचाराचा एक सामान्य प्रकार असला तरी, या कमतरतेचे मूळ कारण शोधणे आवश्यक आहे. आपल्या आहारात पालक आणि मसूर सारख्या लोहयुक्त पदार्थांचा समावेश केल्याने लोहाची पातळी नैसर्गिकरित्या भरून काढण्यास मदत होते. लोहाच्या कमतरतेला कारणीभूत ठरणाऱ्या आरोग्य स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे डॉ गाला यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.