

जगभरात लाखो लोकांचा हार्ट अटॅमुळे मृत्यू होतो. हा अत्यंत गंभीर आजार मानला जातो. मालिकांमध्ये ज्याप्रकारे अचानक छातीत दुखतं आणि ती व्यक्ती हार्ट अटॅकने मरते. हे प्रत्यक्षात खरं नाही. बऱ्याचदा हार्ट अटॅक अत्यंत शांतपणे येतो आणि त्याची लक्षणे ही खूप सामान्य असतात. ती आपण सहजच दुर्लक्षित करतो.
हार्ट अटॅकच्या लक्षणांमध्ये आणि विशेषत: महिलांमध्ये खूप थकवा, स्ट्रेस किंवा अपचन ही लक्षणे दिसतात. जी आपण नेहमीच दुर्लक्षित करत असतो. मात्र जेव्हा हार्ट अटॅक येतो, त्यावेळेस छातीत दाब, जडपणा किंवा छातीत दम भरल्यासारखी भावना जाणवणे अशी लक्षणे दिसतात. या वेदना खूप त्रासदायक असतात. काही लोक या लक्षणांकडे कामाचा स्ट्रेस म्हणून दुर्लक्ष करतात.
हृदयाशी संबंधित त्रास फक्त छातीतच जाणवतो असं नाही. बऱ्याच महिलांना हात, पाठ, मान, तोंड, घसा किंवा पोटात वेदना अशा जागी जाणवते. डॉक्टरांच्या मते, ही लक्षणे इतकी सूक्ष्म असतात की ती अपचन, स्नायू दुखणं किंवा साधी अंगदुखी समजली जातात. त्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाहीत. छातीत वेदना नसतानाही अचानक श्वास घेण्यास त्रास होणे हेही हार्ट अटॅकचे महत्त्वाचे लक्षण ठरू शकते.
कोणतेही विशेष काम न करता दम लागणे, त्यासोबत थकवा किंवा चक्कर येणे जाणवत असल्यास त्याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचे आहे. अनेकदा महिलाच हे लक्षणं साध्या आजारपणाशी जोडून दुर्लक्ष करतात.
काही वेळा अचानक थंड घाम येणे, मळमळ, उलटीसारखी भावना किंवा चक्कर येणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे फ्लू किंवा पोटाच्या तक्रारीसारखी वाटू शकतात, मात्र ती हार्ट अटॅकची सुरुवात असू शकतात. तज्ज्ञांच्या मते महिलांमध्ये ही लक्षणे जास्त प्रमाणात दिसून येतात.
यामागचे कारण समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये कालांतराने चरबीचे थर साचतात. या प्रक्रियेला अॅथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. या थरांपैकी एखादा थर फुटल्यास रक्ताची गाठ तयार होऊन रक्तप्रवाह अडतो आणि हृदयाच्या स्नायूंना इजा होते. त्यामुळे लक्षणे ओळखून तातडीने वैद्यकीय मदत घेणे जीव वाचवू शकते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.