Kamali Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'कमळी’मध्ये प्रेक्षकांना लवकरच एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. हा प्रोमो थिएटरमधील एका प्रसंगाभोवती फिरतो, ज्यात कमळीला झालेली छेडछाड आणि त्यावर ऋषीची संतप्त प्रतिक्रिया दिसून येते.
कमळी, ऋषी आणि अनिका ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये आलेले असतात. चित्रपट सुरू असतानाच मागच्या रांगेत बसलेला एक मुलगा वारंवार कमळीच्या खुर्चीला पायाने लाथ मारतो. पहिल्यांदा हा प्रकार ऋषी थोडा हलक्यात घेते, पण पुन्हा तसेच घडल्यावर ऋषीचे संतापाने रक्त उसळते. तो ताबडतोब त्या मुलाकडे वळून विचारतो“लाथा का मारतोस?” त्यावर तो मुलगा उद्धटपणे उत्तर देतो“त्यात माझी काय चूक? मला खुर्चीवर नीट बसता येत नाही.”
हे ऐकून ऋषीचा संताप शिगेला पोहोचतो आणि तो त्या मुलाला सरळ मारतो. एवढ्यावरही प्रकार थांबत नाही. त्या मुलाचा मित्र पुढे येतो, पण ऋषी त्यालाही कडक शब्दांत गप्प बसवतो. हा संपूर्ण प्रकार पाहून थिएटरमधील वातावरण तंग होतं, तर दुसरीकडे या प्रकारामुळे कमळी अस्वस्थ झालेली दिसते.
या घटनेनंतर मालिकेत पुढे काय घडणार, ऋषीच्या या कृतीमुळे त्याच्या आयुष्यात कोणते परिणाम होतील, आणि कमळी व अनिकाच्या नात्यात काय बदल होईल, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. झी मराठी वाहिनीने या प्रोमोला “थिएटरमध्ये कमळीची छेड काढणाऱ्यांना ऋषी देणार अद्दल” असा कॅप्शन दिले असून येत्या पुढील भागात आणखी नाट्यमय वळण येणार हे निश्चित आहे.