Poet Death News: मराठी साहित्याचा आधारस्तंभ हरपला; महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी काळाच्या पडद्याआड, साहित्यविश्वात शोककळा

Poet Death News: ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांचं वयाच्या ९६व्या वर्षी निधन झालं. ‘ज्यांची वस्तू’ कवितेमुळे घराघरात पोहोचलेल्या धामणस्करांनी मराठी साहित्याला समृद्ध योगदान दिलं.
Poet Death News
Poet Death NewsSaam Tv
Published On

Poet Death News: निसर्ग सौंदर्य, माणसातील क्रौर्य आणि हिंसेविषयीची करुणा आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडणारे ज्येष्ठ कवी दत्तात्रय उर्फ द. भा. धामणस्कर ऊर्फ ‘आबा’ यांचं निधन झालं. शुक्रवारी सकाळी ९.४० वाजता डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान वृद्धापकाळाने त्यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सुना, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे.

द. भा. धामणस्कर यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९३० रोजी अहमदाबाद येथे झाला. गेली अनेक दशके ते डोंबिवलीत वास्तव्यास होते. डोंबिवली एज्युकेशन अँड प्रोग्रेस सोसायटीचे (DEAP) ते माजी संचालक होते. त्यामुळे शिक्षण क्षेत्राशीही त्यांचा जवळचा संबंध होता.

Poet Death News
Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; अस्थमाच्या झटक्याने वयाच्या ४६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

'ज्यांची वस्तू' कवितेमुळे घराघरात पोहोचले

अगदी तरुण वयातच धामणस्करांनी कविता लेखनाला सुरुवात केली. ‘सत्यकथा’, ‘मौज’, ‘दीपावली’, ‘हंस’, ‘मराठवाडा’ यांसारख्या मासिके आणि नियतकालिकांमधून त्यांच्या कविता नियमितपणे प्रकाशित होत असत. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरूनही त्यांचे कवितावाचन झाले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी निमंत्रित कवी म्हणून सहभाग घेतला होता. इयत्ता दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या 'ज्यांची वस्तू' या कवितेमुळे द. भा. धामणस्कर घराघरात पोहोचले. साध्या शब्दांत जीवनाचा मोठा अर्थ सांगणाऱ्या त्यांच्या कवितांशी अनेक पिढ्यांतील विद्यार्थी जोडले गेले.

Poet Death News
Actress Cancer: 'मला वाटलं मी मरणार...'; स्टेज ४ कॅन्सरचं निदान झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव

विविध पुरस्कारांनी गौरव

मौज प्रकाशनाने त्यांचे ‘प्राक्तनाचे संदर्भ’ (१९८२), ‘बरेच काही उगवून आलेले’ (२००१) आणि ‘भरून आले आकाश’ (२०१६) हे कवितासंग्रह प्रकाशित केले. ‘दशकाची कविता’ या काव्यसंकलनातही त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला होता. साहित्य अकादमीच्या ‘साठोत्तरी मराठी कविता’ या खंडात त्यांच्या पाच कवितांचा समावेश आहे. त्यांच्या कवितांचे हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. ‘प्राक्तनाचे संदर्भ’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार, तर ‘बरेच काही उगवून आलेले’ या संग्रहाला कवी कुसुमाग्रज पारितोषिक मिळाले होते. तसेच अनेक संस्थांनी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं होतं.

मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार

द. भा. धामणस्कर यांच्या पार्थिवावर संध्याकाळी पाथर्ली येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम यात्रेत साहित्य क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, माजी सहकारी आणि असंख्य नागरिक सहभागी झाले. त्यांच्या निधनाने डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com