

प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन
वयाच्या ८९ व्या वर्षी राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
कल्याणपूर यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा
संगीत क्षेत्रातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं. सुमन कल्याणपूर यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
सुमन कल्याणपूर यांनी मराठी भावगीत, भक्तीगीत, हिंदी चित्रपटातील अनेक गाणी गायली. त्यांचं योगदान न विसरणारं आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना २०२३ साली 'पद्मभुषण' या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं.
सुमन कल्याणपूर यांचा जन्म २८ जानेवारी १९३७ साली तत्कालीन अविभाजित भारतातील बांगलादेशातील भवानीपूर येथे झाला होता. त्यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. त्यांचं लग्नाआधी आडनाव हेमाडी असे होते. लग्नाआधी त्यांनी सुमन हेमाडी या नावाने गाणी गायले. त्यावेळी गायलेली त्यांची अनेक गाणी लोकप्रिय ठरली.
सुमन कल्याणपूर यांनी रुपेरी पडद्यावर 'कोई पुकारे धीरेसे तुझे आँख के तारे' हे गाणं गायलं होतं. त्यांच्या या गाण्याने त्यांना एका वेगळ्या उंचीवर नेलं. त्यांच्या गाण्यांमध्ये कमालीची शास्त्रीय बैठक पाहायला मिळायची. 'मन मोहन मन मे हो तुम्ही' या अजरामर गीताला 'तानसेन पुरस्कार' देखील लाभला होता.
सुमन यांनी मराठी, हिंदी, बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी या भाषेत हजारो गाणी गायली आहेत. त्यांनी गझल, ठुमरी, भक्तीगीते देखील गायली आहेत.
संगीत क्षेत्रातील आणखी एक तारा निखळला
ज्येष्ठ गायक आणि अभिनेते पंडित चंद्रकांत लिमये यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने गुवाहाटीत निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंडित लिमये सहलीच्या निमित्ताने गुवाहाटीला गेले होते. त्यांचं पार्थिव हे गुवाहाटीतून १ जून २०२६ रोजी दुपारपर्यंत मुंबईत आणले जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी प्रज्ञा, प्राची, दिपा या विवाहित कन्या, जावई, नातवंडे आणि निनाद हा मुलगा असा परिवार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.