Pivali Sadi Song: लग्न म्हणजे सुरुवात किंवा शेवट नाही आहे तर तो एक प्रवास आहे. ज्यात संसाराचा गाडा तो किंवा ती नाहीं तर संपूर्ण कुटुंबाने चालवायचा असतो. स्त्रीला संकटांना सहन करण्याची नैसर्गिक ताकद दिली आहे. म्हणून तिने सहनशीलतेची परीक्षा पाहून स्वतःच अंत का बरा पाहावा. जगणं थांबवणं सोपं आहे पण स्वतःसाठी पुन्हा उभं राहणं हीच खरी स्त्रीची ताकद आहे. जी तिला आयुष्याच्या कुठल्याही अवघड वळणावर नव्याने आयुष्याची सुरुवात करण्याची प्रेरणा देते. आणि
अशाच संसाराच्या गाड्यातून वैयक्तिक आयुष्याला सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीला समर्पित असं 'बिग हिट मीडिया'चे नवंकोरं 'पिवळी साडी' हे गाणं रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. बिग हिट मीडियाने आजवर रसिक प्रेक्षकांना मिलियन व्ह्यूज असलेली गाणी दिली आहेत. ‘गुलाबी साडी’, ‘लैला मजनू’, ‘दोस्ती यारी’, ‘bride तुझी नवरी’ या रोमँटिक गाण्यानंतर आता ‘पिवळी साडी’ हे गाणं साऱ्यांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झालं आहे.
एखादा कठीण प्रसंग स्त्रीवर ओढावल्यानंतर तिला तितक्याच ताकदीने बाहेर येण्यास एका साथीची गरज असते. ही साथ, हा सोबतीचा खांदा यावेळी त्या स्त्रीला भक्कम करतो याचं सुंदर असं वर्णन 'पिवळी साडी' या गाण्यातून करण्यात आलं आहे. पहिल्या पतीपासून त्या स्त्रीला झालेला त्रास आणि त्यामुळे पुन्हा लग्न करण्यावरुन तिच्या उडालेल्या इच्छेला नवं नात वळण देऊ पाहतं. त्या स्त्रीच्या भावना समजून घेत जेव्हा दुसऱ्यांदा बोहोल्यावर ती उभी राहते तेव्हा तो नवरा मुलगा तिला समजून घेत तिला हसायला भाग पाडतो. तेव्हाचा त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्या मुलीच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील काळजीच उडालेलं सावट पाहता हे गाणं बरंच काही शिकवून गेलं.
जुनं विसरून नवं स्वीकारण्याची उमेद देणारं 'बिग हिट मीडिया'चं हे गाणं हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी निर्मिती केलं आहे. तर या गाण्यात अभिनेता अक्षय आठरे आणि अभिनेत्री ऍडव्होकेट वृषाली रकीबे यांचा अभिनय लक्षवेधी ठरत आहे. दिग्दर्शक अभिजीत गायकवाड याने या गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा पेलवली आहे. तर क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून रोहित जाधवने बाजू सांभाळली आहे. बिग हिट मीडियाच्या या गाण्याला हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी साईराम यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. तर गाण्याचे बोल आणि संगीत श्रवणीय (प्रतिक वाघमारे) यांचे आहे. ‘बिग हिट मीडिया’च्या युट्यूब चॅनेलवर हे गाणं प्रदर्शित झालं आहे.