Veen Doghatli Hi Tutena: ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेने प्रदर्शनापूर्वीपासूनच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली. ही मालिका केव्हा सुरू होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अखेर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली असून अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेते सुबोध भावे यांनी मालिकेतील एन्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली. पहिल्यांदाच ही नवी कोरी जोडी टेलिव्हिजनवर महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे.
मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोने तेजश्री व सुबोध यांच्या भूमिकेबाबतची उत्सुकता ही वाढवून ठेवली. याशिवाय मालिकेची लक्षणीय बाब म्हणजे मालिकेचे शीर्षक गीत. प्रत्येक मालिकेच्या शीर्षक गीतानं त्या मालिकेला साजेसं रूप आलेलं पाहायला मिळतं आणि हे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या ओठांवर रेंगाळू लागतं. अशातच ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेच्या शीर्षक गीताने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. हो हे गाणं राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र आणि सुप्रसिद्ध गायक अभिजीत सावंत यांनी गायलं आहे. तर एव्ही प्रफुल्लचंद्र यांचे या गाण्याला संगीत आहे. आणि या गाण्याचे सुंदर असे बोल वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केले आहेत.
आजवर सावनीने अनेक मराठी मालिकांसाठी शीर्षक गीत गायली असून याशिवाय तिने अनेक गाणी गातही रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. सावनीने तेजश्रीसाठी १२ वर्षांपूर्वीही झी मराठी वाहिनीवरील होणार सून मी या घरची या मालिकेसाठी गाणं गायलं होतं. तू मला मी तुला या गाण्याने लोकप्रियतेचा कळस गाठला होता..
आता बारा वर्षांनी पुन्हा एकदा सावनी तेजश्रीसाठी ‘वीण दोघातंली ही तुटेना’ या मालिकेसाठी गायलेल्या गाण्यातून साऱ्यांचं मन जिंकतेय. तेजश्रीचा आवाज म्हणजे सावनीचा आवाज हे एक समीकरणच झालेलं पाहायला मिळालं. आता हे समीकरण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आलं पुन्हा एकदा सावनी तेजश्रीच्या नव्या मालिकेच्या शीर्षक गीतातून साऱ्यांचं मन जिंकते.