Tanvi Kolte: बिग बॉस ५ची विजेती तन्वी कोलते आता एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सारेगम मराठीच्या ‘चाकरी’ या रोमँटिक गाण्यात तन्वी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. विशेष म्हणजे ‘बिग बॉस मराठी’नंतरचा हा तिचा पहिलाच प्रोजेक्ट असून तिच्या अभिनय कारकिर्दीतील हे पहिलेवहिले अल्बम साँग आहे.
‘चाकरी’ हे रोमँटिक आणि नृत्यप्रधान मराठी नॉन-फिल्म गाणं आहे. या गाण्यातून प्रेमाची सुंदर बाजू उलगडण्यात आली आहे. नेहमी ग्लॅमरस अंदाजात दिसणारी तन्वी या म्युझिक व्हिडीओमध्ये मात्र हटके आणि वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. गाण्यात तिचे दोन वेगवेगळे लूक असून त्यापैकी एका लूकमध्ये ती तरुण मुलीच्या भूमिकेत दिसते, तर दुसऱ्या लूकमध्ये उतारवयातील स्त्रीची भूमिका साकारताना दिसते.
या गाण्यात तन्वीने लोकप्रिय व्हायरल क्रिएटर प्रणित काळोखेसोबत पहिल्यांदाच अभिनय केला आहे. ‘चाकरी’च्या म्युझिक व्हिडीओमध्ये एका जोडप्याच्या आयुष्यातील दोन टप्पे दाखवण्यात आले आहेत. तरुण वयातील प्रेमाची निरागसता आणि उत्साह तसेच पुढील आयुष्यातील सहवास, प्रेम आणि एकमेकांप्रती असलेली निष्ठा या गाण्यातून मांडण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणे यांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे तन्वीचा अभिनय, गाण्याची कथा आणि गायकांचा दमदार आवाज यामुळे ‘चाकरी’ गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे.
आपल्या पहिल्या अल्बम साँगबद्दल बोलताना तन्वीने हा प्रोजेक्ट आपल्यासाठी खूप खास असल्याचं सांगितलं. ‘बिग बॉस मराठी’ जिंकल्यानंतरचं हे तिचं पहिलं काम असल्याने या गाण्याबद्दल ती उत्सुक आहे. सारेगमसोबत काम करण्याची इच्छा या गाण्याच्या निमित्ताने पूर्ण झाल्याचंही तिने सांगितलं. गाण्यात उतारवयातील भूमिका साकारणं थोडं आव्हानात्मक होतं, असं तन्वीने सांगितलं. मात्र, दोन्ही लूक उत्तम प्रकारे साकारले गेल्याचं तिला वाटतं. यासोबतच ‘चाकरी’ करणारा हिरो गाण्यात पाहायला मिळतो, तसाच खऱ्या आयुष्यातही आपली ‘चाकरी’ करणारा कोणीतरी लवकर भेटावा, अशी मजेशीर इच्छाही तन्वीने व्यक्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.