अमिषा पटेल आणि सनी देओलच्या ‘गदर २’ ची तुफान चर्चा फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील सुरू आहे. तब्बल २२ वर्षानंतर फार मोठ्या गॅपने ‘गदर’ चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. इतक्या मोठ्या गॅपने जरी हा चित्रपट प्रदर्शित होत असला, या चित्रपटाने २ आठवड्यातच बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा पल्ला गाठला आहे. लवकरच येत्या काही दिवसात हा चित्रपट सहज रित्या ५०० कोटींचा पल्ला गाठेल अशी निर्मात्यांची भावना आहे. भारतातच नाही तर परदेशात सुद्धा चित्रपटाची चर्चा होत असताना, सनी लंडनमध्ये गदरच्या प्रमोशनसाठी गेला आहे. सध्या सनी देओलचा लंडनच्या रस्त्यावरील डान्सचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
नुकताच सनी देओल लंडनमध्ये आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला आहे. यावेळी सनी देओलने तिथल्या रस्त्यांवर भांगडा करुन अवघ्या इंग्लंडकरांचं आपल्याकडे लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी कित्येक भारतीयही आनंदानं सहभागी झाले होते. ट्विटवर हे व्हिडिओ व्हायरल झाले असून सनी आणि गदरच्या टीमवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यावेळी आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी लंडनच्या रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. लंडनमधल्या भारतीयांनी सनीचे जोरदार स्वागत करुन त्याला त्याच्या चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या.
यावेळी प्रमोशनदरम्यान सनीने काही भारतीयांसोबत संवाद सुद्धा साधला. संवाद साधल्यानंतर त्याने माध्यमांना आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली. तो म्हणतो, “आम्ही २० वर्षांपूर्वी गदरच्या पहिल्या भागाची निर्मिती केली होती. आता २०२३ मध्ये ‘गदर २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘गदर’ प्रमाणेच ‘गदर २’ ला सुद्धा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. ही आमच्यासाठी खूपच गर्वाची बाब आहे. ‘गदर’ चित्रपट हा लोकांना एकमेकांसोबत जोडून ठेवणारी एक फिल्म आहे. त्यामुळे त्याची प्रेक्षकांमधली क्रेझ अद्याप ही कमी झालेली नाही. सध्या ‘गदर २’ चित्रपट भारतीय सिनेसृष्टीत वेगवेगळे विक्रम मोडित काढतोय. सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिलेली फिल्म म्हणून गदरचे नाव घ्यावे लागेल. प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे आणि त्याचे होत असलेल्या कौतुकामुळे ‘गदर २’ फिल्म खूपच चर्चेत आली आहे. प्रेक्षकांनी दिलेले योगदान आणि त्यांनी दिलेला भरघोस प्रतिसाद कधीच विसरता येणार नाही.” अशी प्रतिक्रिया अभिनेत्याने दिली.
सनी आणि अमिषा चित्रपट प्रदर्शनापूर्वीही आणि प्रदर्शनानंतर सुद्धा जोरदार प्रमोशन करत आहेत. त्यांचे गेल्या काही दिवसांपासून प्रमोशन दरम्यानचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सनीने चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दरम्यान, सर्वात पहिले भारतीय सैनिकांना ‘गदर २’ दाखवला होता. सोबतच त्यांच्या प्रतिक्रियाही जाणून घेतल्या होत्या. वाघा- अटारी बॉर्डरवर देखील ‘गदर २’च्या टीमने हजेरी लावली होती. त्यावेळीही सनीने पर्यटकांसोबत संवाद साधला होता. अटारी सीमेवरील माहोल पाहता त्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती.
दरम्यान ‘गदर २’च्या एकंदरीत कमाईबद्दल बोलायचे तर, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५० कोटी, तिसऱ्या दिवशी १०० कोटी, चौथ्या दिवशी १५० कोटी, पाचव्या दिवशी २०० कोटी, सहाव्या दिवशी २५० कोटी, आठव्या दिवशी ३०० कोटी, दहाव्या दिवशी ३५० कोटी तर बाराव्या दिवशी अर्थात २२ ऑगस्टला या चित्रपटाने ४०० कोटींची कमाई केली आहे. अवघ्या ७५ कोटींच्या बजेटमध्ये निर्मित केलेल्या या चित्रपटाचे थिएटरमध्ये शो हाऊसफुल्ल आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.