
Shreyas Talpade: बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारा श्रेयस तळपदे सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. श्रेयस तळपदेसह इतर १५ जणांवर उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘द लोनी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ (LUCC) या चिटफंड कंपनीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. ही कंपनी ग्रामीण भागातील लोकांना पैशाचे दुप्पट उत्पन्न देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.
महोबा पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि ४०६ (विश्वासघात) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीने लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले आणि नंतर अचानक जिल्ह्यातून पळ काढला. या फसवणुकीमुळे अनेक गावकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
या प्रकरणात श्रेयस तळपदे यांचे नाव समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार, कंपनीच्या जाहिरातीत किंवा प्रचारात श्रेयस याचा सहभाग असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप श्रेयस तळपदे याच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि सर्व आरोपींची भूमिका तपासली जाईल. या प्रकरणात श्रेयस तळपदेसह समीर अग्रवाल, सानिया अग्रवाल, आरके शेट्टी, संजय मुदगिल, ललित विश्वकर्मा, दलचंद कुशवाह, सुनील विश्वकर्मा, सचिन रायकवार, कमल रायकवार, सुनील रायकवार, महेश रायकवार, मोहन कुशवाह, जितेंद्र नामदेव, नारायण सिंग राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महोबा येथे ही चिट फंड कंपनी द लोनी अर्बन मल्टी स्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही कंपनी गेल्या १० वर्षांपासून महोबा आणि आसपासच्या परिसरात सक्रिय होती. लोकांना जास्त परतावा देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे गुंतवण्यास भाग पाडले जात होते. कंपनीच्या व्यवस्थापनाने ग्रामीण भागातील लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये जमा केले आणि नंतर अचानक संपर्क तोडला. या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
श्रेयस तळपदे हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने ‘इक्बाल’, ‘गोलमाल’ सिरीज आणि अलीकडेच ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र, या प्रकरणामुळे त्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात इतर १४ आरोपींचीही नावे नोंदवली असून, त्यांचा शोध सुरू आहे.
या घटनेने चिटफंड कंपन्यांद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. पोलिसांनी लोकांना अशा आमिषांना बळी पडू नये आणि कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, असे आवाहन केले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व पैलू स्पष्ट होतील, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.