>> संतोष भिंगार्डे
Shivrayancha Chhava Movie Review in Marathi :
लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या शिवरायांचा छावा या चित्रपटाची गेले अनेक दिवस सगळीकडे चर्चा सुरू होती. चित्रपटाचे पोस्टर तसेच टीझर आणि ट्रेलर लाँच झाल्यानंतर सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली होती. आता हा चित्रपट भव्य स्तरावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा मांडण्यात आली आहे. (Latest Marathi News)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याची धुरा आपल्या हाती कशी घेतली... जुन्याजाणत्या तसेच तरुण मावळ्यांसह त्यांनी आपल्या अजोड पराक्रमाच्या जोरावर मराठा साम्राज्याचा विस्तार मोठ्या हुशारीने आणि धाडसाने कसा केला...शौर्य, धाडस आणि हुशारीने केलेली बुऱ्हाणपूरची लढाई..असा एकूणच छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता आणि प्रेरणादायी असा प्रवास शिवरायांचा छावा या चित्रपटात मांडण्यात आला आहे.
या चित्रपटाच्या कथेला सुरुवात होते ती रायगडावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकापासून. सरसेनापती हंबीरराव यांच्यासहित बहिर्जी नाईक, येसाजी कंक, मानाजी मोरे व रुपाजी भोसले आदी जुन्याजाणत्या तसेच तरुण मावळ्यांच्या उपस्थितीत शंभूराजांचा मोठ्या थाटामाटात राज्याभिषेक होतो.
त्यानंतर संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांची राजनीती, समाजकारण आणि धर्मकारण... राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी शंभूराजांना दिलेले संस्काराचे धडे आणि शिकवण, गनिमी काव्याने शंभूराजांनी व त्यांच्या मावळ्यांनी औरंगजेबाला दिलेली चपराक आणि अखेर बुऱ्हाणपूरमध्ये हैदौस माजविलेल्या क्रूर खानबरोबरची लढाई...असा छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे आणि शेवटी चित्रपटाचा पुढील भाग येणार याची कल्पना देण्यात आली आहे.
लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने या ऐतिहासिक पटाची मांडणी आणि एकूणच आखणी सुरेख केली आहे. खरं तर ऐतिहासिक चित्रपट बनविण्यात दिग्पालचा हातखंडा आहे आणि ते शिवराज अष्टक मधील चित्रपट मालिका पाहून ते सिद्ध झाले आहे. तो एक उत्तम लेखक आहेच शिवाय कुशल दिग्दर्शक आहे.
त्याने आपले दिग्दर्शकीय कौशल्य त्याच्या आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून सिद्ध केले आहे. हा चित्रपटही त्याने त्याच उमेदीने आणि उत्साहाने भव्य स्तरावर बनविलेला आहे. त्याला उत्तम साथ कलाकारांनी दिली आहे मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, भूषण पाटील, रवी काळे, समीर धर्मधिकारी, राहुल देव, विक्रम गायकवाड, भूषण शिवतरे,अमित देशमुख, तृप्ती तोरडमल, ईशा केसकर, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र, बिपीन सुर्वे आदी कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे.
अभिनेता भूषण पाटीलने शंभूराजांच्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत पडद्यावर निश्चितच जाणवते. त्याने आपल्या डोळ्यांतून विविध भाव छान व्यक्त केले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांची चिन्मय मांडलेकरने साकारलेली भूमिका लक्षात राहणारी आहे. समीर धर्माधिकारीने औरंगजेबाच्या भूमिकेत गहिरे रंग भरलेले आहेत. काकर खान ही खलनायकी भूमिका राहुल देवने साकारली आहे आणि त्याने आपली चमक-धमक या भूमिकेतून छान दर्शविली आहे.
अभिनेता प्रसन्न केतकरने सरसेनापती हंबीरराव यांची व्यक्तिरेखा सुरेख साकारली आहे. महाराणी येसूबाईच्या भूमिकेत तृप्ती तोरडमलने छान काम केले आहे. रवी काळेने साकारलेली गुप्तहेर बहिर्जी नाईकची भूमिका लक्षात राहणारी अशीच आहे. चित्रपटातील संवाद धारदार आणि दमदार आहेत. सिनेमॅटोग्राफर प्रियांका मयेकरने तिची कामगिरी चांगली केली आहे. युद्धाचे प्रसंग तिने आपल्या कॅमेऱ्यात उत्तम टिपलेले आहेत. वेशभूषा आणि केशभूषा कथानकाला साजेशी अशी झाली आहे.
अमर मोहिलेच्या चित्रपटाचे पार्श्वसंगीतामुळे चित्रपट अधिक रंजक झाला आहे. विशेष बाब म्हणजे चित्रपटाचे संगीत सुमधुर आहे. त्याकरिता देवदत्त मनीषा बाजी यांचे कौतुक करावे लागेल. तरीही चित्रपटात काही अतार्किक बाबी आहेत. त्या मनाला पटत नाहीत. तरीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतुलनीय शौर्यगाथेचा पहिला भाग पाहावा असाच आहे. उर्वरित भाग लवकरच येतील अशी अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.