ज्येष्ठ लेखक आणि बहुआयामी साहित्यिक अनिल मधुसूदन कालेलकर यांचे ११ डिसेंबर रोजी सकाळी ९:१५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. वयाच्या ७७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठीसह, हिंदी आणि गुजराती साहित्य–मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केले जात आहे.
अनिल कालेलकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९४७ रोजी मुंबईतील वांद्रे येथे झाला. प्राथमिक शिक्षण दादरमधील छबीलदास हायस्कूलमध्ये तर उच्च शिक्षण वांद्रेतील नॅशनल कॉलेजमध्ये झाले. ते अविवाहित होते. कुटुंबात सुनील, सुधीर, शिरीष आणि जयश्री कालेलकर अशी भावंडे आहेत. त्यांनी भाची गौरी कालेलकर चौधरी यांच्या सोबत ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन’ या निर्मिती संस्थेची स्थापना केली होती. अनेक वर्षे ते साहित्य सहवास, बांद्रा (पूर्व) येथे वास्तव्याला होते.
चित्रपट आणि मालिकांच्या जगतात अनिलजींचा ठसा अतिशय प्रभावी आणि कायमस्वरूपी मानला जातो. त्यांनी २५ पेक्षा अधिक मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांचे पटकथा–संवाद लेखन केले. त्याचबरोबर २५ हून अधिक हिंदी–मराठी–गुजराती मालिकांचे लेखन करत त्यांनी दूरदर्शन इतिहासात वेगळी ओळख निर्माण केली. सलग १७ मालिकांचे सातत्यपूर्ण लेखन हा दूरदर्शन क्षेत्रातील एक दुर्मिळ आणि अभूतपूर्व विक्रम त्यांच्या नावे नोंदला गेला.
हिंदी आणि मराठी मिळून १२ सस्पेन्स–थ्रिलर मालिका हा त्यांचा विशेष अभ्यासाचा आणि अत्यंत यशस्वी ठरलेला विभाग. ‘बंदिनी’, ‘परमवीर’, आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या तीनही मालिकांना सलग तीन वर्षे सर्वोत्कृष्ट मालिकेचे पारितोषिक मिळाले ही अनिलजींच्या लेखनशक्तीची अद्वितीय हॅटट्रिक ठरली.
आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक विविध विषयांवर लेखन केले आणि प्रत्येक विषयावर तेवढीच प्रभावी, संवेदनशील आणि आकर्षक मांडणी केली. आज अनेक चॅनल्स ज्या संकल्पना स्वीकारत आहेत, त्या संकल्पना अनिलजींनी दशकांपूर्वीच आपल्या लेखणीतून साकारल्या होत्या. त्यांच्या कथा, मांडणी आणि आशय हे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि सर्जनशीलतेचे प्रतीक होते. अनिल मधुसूदन कालेलकर यांच्या जाण्याने साहित्य, चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्राने एक बहुमोल आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.