Krantijyoti Vidyalay: ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या आगामी मराठी चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याने चाहते आणि विद्यार्थी दोघांचीही मनं जिंकली. चित्रपटातील पहिलं गीत ‘शाळा मराठी’ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर दुसरं गाणं ‘स्वर्गात आकाशगंगा’ हे नुकतेच अभिनव ज्ञानमंदिर प्रशालेच्या पटांगणात एका आगळ्या-वेगळ्या पद्धतीने अनावरण करण्यात आले. या खास निवडीमागे एक भावनिक कारणही आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचे या शाळेशी असलेले अतूट नातं.
हेमंत ढोमे यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनातील या शाळेतच पहिल्यांदा नाटकात पाऊल ठेवले. त्यामुळे या सोहळ्याला त्यांच्या आयुष्यातील एक विशेष स्थान आहे. अनावरणावेळी विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. कलाकारांनी विद्यार्थ्यांसोबत गाण्यावर थिरकून वातावरण आणखी रंगतदार केले. शिक्षक, विद्यार्थी आणि चित्रपटाची संपूर्ण टीम मिळून हा क्षण अविस्मरणीय बनवला.
‘स्वर्गात आकाशगंगा’ हे सुप्रसिद्ध साहित्यिक स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं कालातीत गीत असून संगीतकार हर्ष-विजय यांनी याला आधुनिक आणि नॉस्टॅल्जिक असा नवा अंदाज दिला आहे. गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्या भावस्पर्शी आवाजाने या गाण्याला अधिक मोहक रूप मिळालं आहे.
सोहळ्यात अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर तसेच कलाकार व तांत्रिक टीमचे अनेक सदस्य उपस्थित होते. विद्यार्थ्यांची ऊर्जा, गाण्याचा ताल आणि आनंदाने भरलेलं मैदानामुळे हा कार्यक्रम धमाकेदार ठरला. दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी भावूक होत सांगितले की, “या शाळेने मला घडवलं. माझी पहिली नाट्यभूमी हीच होती. या शाळेचं माझ्यावर उपकार आहेत आणि त्याचं ऋण फेडण्याची संधी मला या चित्रपटामुळे मिळाली.”
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट १ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत झळकणार असून त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि मराठी चित्रपटात पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले असून, क्षिती जोग निर्माती आहेत तर विराज गवस, उर्फी काझमी आणि अजिंक्य ढमाळ सहनिर्माते आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.