Saiyaara OTT Release: दिग्दर्शक मोहित सूरी यांचा 'सैयारा' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करुन चांगलेल यश मिळवत आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आणि अल्पावधीतच भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या प्रेमकथांपैकी एक ठरला. संगीत आणि हृदयाला भिडणारी कहाणी यामुळे थिएटरमधील प्रेक्षकांनी या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला. आता ‘सैयारा’ ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.
१२ सप्टेंबरपासून ‘सैयारा’ नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार असून जगभरातील तब्बल १९० देशांमध्ये हा चित्रपट उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ज्यांना थिएटरमध्ये हा चित्रपट पाहता आला नाही, त्यांना घरी बसून हा रोमँटिक प्रवास अनुभवता येणार आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘सैयारा’ने विक्रमी कामगिरी केली आहे. भारतात या चित्रपटाने ३२९ कोटी रुपयांची कमाई केली, तर जगभरातील एकूण कमाई जवळपास ५७० कोटी रुपयांवर पोहोचली. त्यामुळे हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी प्रेमकथांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
आता थिएटरनंतर ओटीटीवर प्रदर्शित होत असल्याने ‘सैयारा’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या चर्चेत येणार यात शंका नाही. विशेषतः प्रेमकथा आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी आणि तरुणपिढीसाठी हा चित्रपट नक्कीचं खास असणार आहे.