Rinku Rajguru: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी ती एका वेगळ्या आणि दमदार भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. झी स्टुडिओजच्या आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये रिंकूचा जबरदस्त अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच रिंकू अॅक्शन भूमिकेत दिसणार असल्याने तिच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
स्त्रीच्या संघर्षाची कहाणी मांडणार ‘जिजाई’
प्रत्येक स्त्री घरातील जबाबदाऱ्या सांभाळत कुटुंबासाठी धडपडत असते. मात्र, या प्रवासात तिच्या सुरक्षिततेचा, स्वाभिमानाचा आणि अस्तित्वाचा प्रश्न अनेकदा निर्माण होतो. अन्याय सहन करण्याऐवजी त्याविरोधात उभे राहण्याची ताकद स्त्रीमध्ये असते, हाच महत्त्वाचा विषय ‘जिजाई’ या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार करणाऱ्या एका स्त्रीची संघर्षमय कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
रिंकूचा अॅक्शन अवतार चर्चेत
मुंबईत एका खास कार्यक्रमात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमध्ये घनदाट जंगल, रात्रीचा अंधार, सुनसान रस्ता, बसमधील प्रवास आणि पोलिसांचा तपास अशा अनेक थरारक प्रसंगांची झलक पाहायला मिळते. यासोबतच रिंकू राजगुरूचे दमदार अॅक्शन सीन्स लक्ष वेधून घेत आहेत. तिच्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय? तिच्यासमोर कोणती आव्हाने आहेत? या सगळ्यामागे कोणतं रहस्य दडलं आहे? या प्रश्नांची उत्तरे मात्र ट्रेलरमध्ये गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
दिग्गज कलाकारांची फौज
या चित्रपटात रिंकू राजगुरूसोबत किशोर कदम, मयूर मोरे, रोहित कोकाटे आणि सानिका दिवाण हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. प्रत्येक कलाकाराच्या व्यक्तिरेखेबाबत ट्रेलरमध्ये उत्सुकता निर्माण करण्यात आली आहे.
कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुपूर गुहा आणि तुषार राऊत हे सहनिर्माते आहेत. गुलराज सिंग यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. स्त्रीच्या स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची कथा सांगणारा ‘जिजाई’ येत्या २० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.