'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर ब्रह्ममुहूर्तावर रिलीज
4000 कोटींचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
ट्रेलर पाहून यशच्या अभिनयाची तुफान चर्चा
बहुप्रतीक्षित चित्रपट 'रामायण'चा अखेर ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यावर काही तासातच 'रामायण' चित्रपटाची तुफान क्रेझ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. 'रामायण' हा नितेश तिवारी दिग्दर्शित आहे. ३० जुलै रोजी 'ब्रह्ममुहूर्ता'वर 'रामायण'चा ट्रेलर जगभरात रिलीज झाला. ट्रेलरच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "द रामायण ट्रेलर, येथूनच या महागाथेची सुरुवात होते..."
चार मिनिटे नऊ सेकंदांत प्रभू रामाच्या आयुष्याची एक झलक पाहायला मिळते. तसेच रावणाचा रौद्र अवतार आणि युद्धाची झलक दिसते. भारतीय चित्रपटसृष्टीत क्वचितच पाहायला मिळणारे प्रभावी व्हीएफएक्स (VFX) यांचा समावेश आहे. ट्रेलरची सुरुवात यशच्या 'रावण' पात्राने अंधारातून बाहेर येऊन सिंहासनावर दावा सांगण्याच्या दृश्याने होते. त्यानंतर अयोध्येची भव्य दृश्ये आणि एका प्राचीन कथेची पार्श्वभूमी मांडणारे नॅरेशन पाहायला मिळते. रणबीर कपूरचे भगवान राम म्हणून आगमन होते; सुरुवातीला तो साध्या भगव्या वस्त्रात दिसतो आणि हळूहळू एका योद्धा राजपुत्राच्या रूपात अवतरतो.
साई पल्लवीची 'सीता' म्हणून ओळख करून दिली जाते, जिथे ती रामासोबतचे प्रेमाचे क्षण अनुभवताना दिसते. त्यानंतर कथेचा ओघ त्यांच्या वनवासाकडे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या लक्ष्मणाकडे (रवी दुबे) वळतो.यशचा 'रावण' या ट्रेलरचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकतो. यात रावणाला एका प्रभावी आणि भव्य व्यक्तिमत्त्वाच्या रूपात सादर केले आहे. त्याचे सुवर्णकवच, बारकाईने केलेली वेशभूषा आणि चेहऱ्यावरील भेदक भाव अशा एका खलनायकाची निर्मिती करतात, जो खूप भीतीदायक वाटतो.
'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. सनी देओल प्रभू हनुमानाच्या आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहेत.लारा दत्ता (कैकेयी), रकुल प्रीत सिंग (शूर्पणखा), काजल अग्रवाल (मंदोदरी), अरुण गोविल (राजा दशरथ), विवेक ओबेरॉय (विद्युज्जिह्व), कुणाल कपूर (इंद्र देव), आदिनाथ कोठारे (भरत) यांचा समावेश आहे, तर अनुपम खेर यांनी जटायूला आपला आवाज दिला आहे.४,००० कोटी रुपयांच्या प्रचंड बजेटमध्ये तयार झालेला 'रामायण' हा चित्रपट पौराणिक कथांवर आधारित असून 'रामायण' चित्रपटाचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत रिलीज होणार आहे.