
केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा'ची सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान बॅटिंग सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल ५० दिवस उलटले असले तरी, चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा अजूनही कायम तसाच आहे. सेलिब्रिटींकडून, चित्रपट समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून कलाकारांना आणि दिग्दर्शकांना आपल्या कामाची पोचपावती मिळत आहे. जया, शशी, साधना, चारु, केतकी आणि पल्लवी या सहा बहिणींची कथा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील आवडली आहे. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपट पाहिला असून त्यांनी चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'बाईपण भारी देवा'चे कौतुक एका व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे. राज ठाकरे व्हिडीओमध्ये म्हणतात, “हा चित्रपट फक्त महिलांनीच न पाहता, पुरूषांनीही पहावा असा हा सिनेमा आहे. माता, भगिनी कोणत्या कोणत्या परिस्थितीतून जातात ही बाब प्रत्येक पुरूषाने पहावी. म्हणूनच हा चित्रपट प्रत्येक पुरूषाने पाहायलाच हवा. चित्रपट पाहिल्यावर महिला स्वतःला रिलेट तर करतातच, परंतू पुरुषांनीही आपल्या रोजच्या जीवनात जर काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या काढून टाकणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच बाईपणच्या कथानकामध्ये खरं यश हे आहे.”
हा व्हिडीओ 'मनसे अधिकृत'या ट्वीटर हँडलवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना, "हा चित्रपट महिलांपेक्षा पुरुषांनी पाहायचा चित्रपट आहे... 'बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया !" अशा आशयाचं कॅप्शन देत व्हिडीओ शेअर केला आहे. चित्रपटाने आतापर्यंत ७६ कोटीचा टप्पा पार केला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन ५० दिवसांचा टप्पा पुर्ण झाला आहे.
चित्रपटाविषयी बोलायचे तर, जिओ स्टुडिओ निर्मित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने प्रत्येक स्त्रीला जगायलं शिकवलं आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री आहेत. माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट गेल्या ३० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.