'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट 31 ऑक्टोबरला रिलीज झाला आहे.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचे कौतुक राज ठाकरे यांनी केले आहे.
कलाप्रेमी राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांच्या (Mahesh Manjrekar) 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' (Punha Shivajiraje Bhosle) चित्रपटाचे समीक्षण केले. त्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्यात. शेतकरी, मराठी माणसाबाबत राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्याच, पण त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही टीकेचा बाण सोडला. "खरा समकालीन किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाला पर्याय नाही..." असे कौतुक राज ठाकरेंनी केलेय. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले?
"मी २ दिवसांपूर्वी, माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट पाहिला... समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही... पण खरा समकालीन, किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाला पर्याय नाही... आज फक्त मोठे मोठे महामार्ग, पूल (ज्यावर काही महिन्यात खड्डे पडतात ) आणि चमकदार घोषणा म्हणजे 'विकास' अशी कल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली आहे. यांत बाकी कोणाचा विकास होतो की नाही माहित नाही पण सत्ताधाऱ्यांचा विकास नक्की होतो. हे केलं आणि धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की मग शेतकरी असो की इथला मराठी माणूस यांना हवं तसं वापरून फेकून द्यायला हे मोकळे.
या राज्यातील शेतकरी तर पार हतबल आहे. एका बाजूला पाऊस झोडपतो आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा अनास्थेने झोडपते. याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्याच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो हे भीषण दुर्दैव आहे. एका बाजूला ग्रामीण भागात शेतकऱ्याला इतकं जेरीस आणायचं की त्याला जमीन विकावीच लागेल आणि दुसरीकडे शहरात मराठी माणसांनाच घरं नाकारायची, त्यांच्या भाषेचा अपमान करणाऱ्यांना अभय द्यायचं, त्यांनी काय खायचं ? काय नाही खायचं यावर बंधन आणणऱ्यांचे लाड करायचे हे सुरु आहे.
हे सगळं मराठी माणसाला दिसत नाहीये का ? दिसत असेल ही... पण जोपर्यंत तुमच्या मनात याविरोधात चीड निर्माण होणार नाही, आग निर्माण होणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणं सोडा अजून भीषण होईल. या सिनेमातून ही चीड महेश मांजरेकर, त्यांचे कलाकार आणि त्यांचे लेखक यांनी उत्तम मांडली आहे. हा फक्त चित्रपट नाही तर या टीमच्या मनातील अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता महाराष्ट्रातील जनतेने अनुभवयाला हवी. त्यासाठी माझं तुम्हाला आवाहन आहे की 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट जरूर पहा...
राज ठाकरे ।"
महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट 31 ऑक्टोबर 2025 ला रिलीज झाला आहे. चित्रपटाने दोन दिवसांत चित्रपटाने अंदाजे 53 लाख रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ बोडके झळकला आहे. चित्रपटात त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, पायल जाधव, सिद्धार्थ जाधव, पृथ्वीक प्रताप, सयाजी शिंदे, विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई हे कलाकार झळकले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.