Siddharth Jadhav: महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाबद्दल आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये कुतूहल आहे आणि आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या पोस्टरनं ही उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसानिमित्ताने या चित्रपटातील त्याचा लूक उलगडण्यात आला आहे, जो त्याच्या आतापर्यंतच्या कोणत्याही भूमिकेपेक्षा एकदम वेगळा आहे. चेहऱ्यावरील रक्त, व्रण, उरात धडकी भरवणारी नजर आणि त्या नजरेत दडलेलं क्रोर्य असं आक्राळ विक्राळ रूप असलेला सिद्धार्थ जाधव या पोस्टरमध्ये दिसत आहे. त्याच्या या लूकमुळे त्याची यात नेमकी काय भूमिका असेल याबद्दलची आणि सोबतीला चित्रपटाबद्दलचीही प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे.
आपल्या भूमिकेबद्दल सिद्धार्थ जाधव म्हणतो, ''या भूमिकेबद्दल सांगायचं तर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटातील माझी ही भूमिका माझ्या आजवरच्या कारकिर्दीमधली सगळ्यात वेगळी आहे. या पात्रामध्ये जी क्रुरता आहे ती त्याच्या लूकमध्ये उतरणं खूप गरजेची होती. माझ्या या लूकचं पूर्ण श्रेय महेश सरांचं आहे. त्यांनी मला माझा एक फोटो पाठवायला सांगितला आणि त्यावर काम करून माझा हा लूक तयार केला.
सिद्धार्थ जाधव पुढे म्हणाला, जेव्हा हा लूक माझ्याकडे आला, तेव्हा मी स्वतःच थक्क झालो. मी असाही दिसू शकतो? असा प्रश्न मला पडला. अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वी कधीच साकारली नाही. परंतु माझा महेश सरांवर पूर्ण विश्वास असल्याने मी सुद्धा या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. सध्यातरी मी भूमिकेविषयी जास्त काही बोलू शकत नाही, परंतु मला खात्री आहे की, प्रेक्षकांना माझं हे रूप नक्कीच आवडेल.
द ग्रेट मराठा एन्टरटेनमेंट, सत्य-सई फिल्म्स आणि क्रिझोल्हची निर्मिती असलेला हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून येत्या ३१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून या चित्रपटात विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने ,नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ जाधव हे मातब्बर कलाकार बघायला मिळणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. महेश मांजरेकर यांची कथा, पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी याची निर्मिती केली असून झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.