मराठी टेलिव्हिजन विश्वात सध्या अनेक मालिकांच्या कथानकांमध्ये आणि वेळापत्रकांमध्ये बदल होताना दिसत आहेत. यंदाच्या वर्षात स्टार प्रवाह वाहिनीवर अनेक नव्या मालिकांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत मनोरंजनाची सुरुवात केली, तर काही जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. अशातच आता स्टार प्रवाहवरील आणखी एका मालिकेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची प्रमुख भूमिका असलेली 'आमच्या लाडक्या नाईकबाई' ही मालिका लवकरच बंद होणार आहे.
'आमच्या लाडक्या नाईकबाई' मालिकेच्या शेवटच्या भागाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात लाडबाईंचा खोटेपणा घरातील लोकांसमोर येतो. घरातील लोक नाईकबाईंना मानाने स्वीकारतात. त्यानंतर नाईकबाई लाडबाईंना हाताला धरून बाहेर काढतात. अशाप्रकारे एका कौटुंबिक गोष्टीचा शेवट आनंदाचा दाखवण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, "अखेर नाईक बाईंना घरात मिळणार योग्य तो मान..."
'आमच्या लाडक्या नाईक बाई' मालिकेचा अंतिम भाग रविवार 22 नोव्हेंबर दुपारी 1:00 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. मालिका अशी अचानक चार महिन्यात संपल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते भरभरून कमेंट्स करत आहेत.
'आमच्या लाडक्या नाईकबाई' ही मालिका १० ऑगस्ट २०२६ रोजी स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झाली होती. सुरुवातीला ही मालिका संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जात होती. मात्र, काही काळानंतर वाहिनीकडून मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला. त्यानुसार मालिकेचे प्रसारण संध्याकाळऐवजी दुपारी १ वाजता करण्यात आले. अवघ्या काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली ही मालिका १०० भागांचा टप्पा गाठण्याआधीच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
'आमच्या लाडक्या नाईकबाई' ही मालिका एका शिक्षिकेच्या आयुष्यातील भावनिक संघर्ष आणि कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित आहे. या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी शारदा नाईक यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. शारदा नाईक या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अत्यंत लाडक्या शिक्षिका आहेत.मात्र, विद्यार्थ्यांसाठी नेहमी हसतमुख आणि खंबीर असणाऱ्या शारदा नाईक यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्या आहेत. घरातील परिस्थिती, मानसिक त्रास आणि कौटुंबिक संघर्ष यांचा सामना त्यांना करावा लागतो. बाहेरच्या जगात इतरांना आधार देणाऱ्या शारदा स्वतःच्या आयुष्यातील वेदना कशा सहन करतात, हे मालिकेतून दाखवण्यात आले आहे. या मालिकेत अभिनेत्री अमृता धोंगडे हिने लाडबाईंची भूमिका साकारली आहे. तिचे व्यक्तिमत्त्व वरकरणी गोड आणि मनमिळाऊ वाटत असले, तरी तिच्या वागण्यामागे वेगळे हेतू दडलेले असतात. आपल्या बोलण्याने आणि वागण्याने ती लोकांचा विश्वास संपादन करते. मात्र, योग्य संधी मिळताच आपल्या चतुर डावपेचांचा वापर करून इतरांना अडचणीत आणते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.