सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेले नाटक म्हणजे 'जर तर ची गोष्ट'. सोनल प्रॉडक्शन निर्मित, अद्वैत दादरकर, रणजित पाटील दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या नाटकाने सध्या सर्व नाट्यगृहांबाहेर 'हाऊसफुल्ल'चा बोर्ड झळकळवला आहे.
५ ऑगस्टपासून नाट्यरसिकांच्या भेटीला आलेल्या या नाटकाने आतापर्यंत सुमारे १५ प्रयोग केले असून हे सर्व प्रयोग हाऊसफुल्ल गेले आहेत. यावरूनच हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याची पोचपावती आहे.
प्रिया बापट सादर करत असलेल्या या नाटकाचे निर्माते नंदू कदम आहेत, तर या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय आणि आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दहा वर्षांनी प्रिया बापट आणि उमेश कामत एकत्र रंगभूमीवर काम करत असल्याने, त्यांच्या चाहत्यांना त्यांना पाहण्याची विशेष उत्सुकता आहे.
या नाटकावर सर्व वयोगटातील प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
नाटकाला मिळत असलेल्या यशाबद्दल निर्माते नंदू कदम म्हणतात, ''पहिल्या दिवसापासून नाटक हाऊसफुल्ल आहे. खूप आनंद होतोय. या नाटकातील कलाकार जितक्या ताकदीचे आहेत. तितकेच दर्जेदार या नाटकाचे लेखनही आहे. हा दुग्धशर्करा योग जुळून आल्यानेच हे नाटक नाट्यरसिकांना आवडत आहे. आतापर्यंत मुंबईत आणि पुण्यात झालेल्या प्रयोगावरून आम्हाला अंदाज येतोय की पुढील प्रयोगही असेच हाऊसफुल्ल असतील.'
तिकीटविक्री सुरु झाल्यापासून अवघ्या काही तासांमध्येच हे शो फुल्ल होत आहेत. अनेक प्रेक्षक याबाबत खंतही व्यक्त करत आहेत. यावरूनच हे नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक किती उत्सुक आहेत, याची कल्पना येतेय. आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी जास्त प्रयोग लावण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.''
प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल प्रिया बापट आणि उमेश कामत म्हणतात, ''प्रेक्षकांना आम्हाला रंगमंचावर एकत्र पाहण्याची इच्छा होती आणि दहा वर्षांनंतर ती पूर्ण झाली. 'जर तर ची गोष्ट'ला नाट्यरसिकांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. नाटक संपल्यावर प्रेक्षक आम्हाला आवर्जून भेटायला येत आहेत.
नाटकाचं, आमचं कौतुक करतात. सोशल मीडियावरही अनेकांचे संदेश येत आहेत. अनेकांना हे नाटक पुन्हा पाहण्याची इच्छा आहे. नाटकाबद्दलच्या या सकारात्मक प्रतिक्रिया मनाला उभारी देणाऱ्या आहेत. तुमच्या सर्वांचे हे प्रेम पाहून आम्हाला अधिक उत्तम काम करण्याची ऊर्जा मिळते. कलाकाराला याहून जास्त काय हवं.''
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.