‘अरे हाय काय अन् नाय काय'... असं म्हणत रंगभूमीवर धुमाकूळ घालणारा माधव आठवतोय का? रसिकांना हास्याची मेजवानी देणारा माधव मध्यंतरी रंगभूमीवर दिसेनासा झाला. त्यानंतर 'गेला माधव कुणीकडे' असं विचारणाऱ्या नाट्यरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, अहो आपला माधव धुमाकूळ घालायला परत येतोय.!
'अरे हाय काय अन् नाय काय' असे म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झाली आहे. या जोडीच्या 'गेला माधव कुणीकडे' या खुमासदार नाटकाने अनेक वर्ष रसिकांचे मनोरंजन केले.
या दोघांच्या अफलातून टायमिंगवर पब्लिक फुल टू फिदा झालं. या नाटकातील प्रशांत दामले यांचा 'अरे हाय काय अन् नाय काय' हा डायलाॅग आजही चांगलाच पाॅप्युलर आहे. सलग एक तपाहून अधिक काळ या नाटकाची लोकप्रियता वाढतच गेली. ७ डिसेंबर १९९२ ला रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाचे आजवर १८०२ प्रयोग झाले.
मध्यंतरी काही वर्षे या नाटकाने 'ब्रेक' घेतला खरा पण रसिकांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुन्हा हे धमाल नाटक रसिकांच्या सेवेत रुजू होत आहे. गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित 'गेला माधव कुणीकडे' नाटकाचा शुभारंभ १५ जूनला वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात दुपारी ४.००वा. होणार आहे. तिकीट विक्रीचा शुभारंभ १ जून रोजी फक्त ‘तिकीटलाय’ ॲप वर सुरु होईल.
रसिकांना हसवण्याचं आपलं कर्तव्य चोख बजावत रंगभूमी हीच कर्मभूमी मानत एकापेक्षा एक सरस नाटकं देणाऱ्या प्रशांत दामले यांनी पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आणत रसिकांना मनोरंजनाची अफलातून ट्रीट दिली आहे. काही नाटकांना रसिकांचं अफाट प्रेम लाभतं. ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक त्यापैकीच एक. मायबाप रसिकांसाठी ' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणताना अतिशय आनंद होत असल्याचे अभिनेता प्रशांत दामले यांनी सांगितले.
वसंत सबनीस लिखित आणि राजीव शिंदे दिग्दर्शित 'गेला माधव कुणीकडे' नाटकाची संहिताच धमाकेदार होती. दोन कलावंत आपापल्या भूमिका घेऊन अभिनयाची जी जुगलबंदी पेश करायचे त्याला तोड नाही. दोन महिलांशी लग्न केल्यामुळे उभा राहिलेला पेच आणि त्यातून निर्माण होणारे अनेक विनोदी प्रसंग, ते लपवण्यासाठी परस्परांना फसविण्याचा खेळ कुठल्या टोकाला जातो याची धमाल रसिकांना हास्याची मेजवानी देणारी असायची. प्रशांत दामले आणि विनय येडेकर या जोडीसोबाबत नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख, अक्षता नाईक आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.