

Kiran Mane Career: सोशल मीडियावर काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे किरण माने. बिग बॉस मराठी पासून सातारचा सलमान म्हणून ओळख मिळालेल्या या नावाची मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच क्रेझ आहे. सामाजिक विषयांपासून, राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक घडामोडीवर किरण मानेची प्रतिक्रिया यायला हवीच. किरण माने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. आज त्याने सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव पोस्टच्या माध्यमातून सांगितला आहे.
किरण मानेने आपल्या फिल्मी आयुष्याची सुरूवात नाटकाच्या माध्यमातून केली होती. किरण मानेने नाटक, मालिका आणि चित्रपट यातून त्याने प्रसिद्धी मिळवली. करियरच्या सुरुवातीला नाटक पाहण्यासाठी केलेली धडपड सोशल मीडिया पोस्टवरून दिसत आहे. आपला पुर्ण प्रवास त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून मांडला आहे. समीक्षकांनी किरण मानेवर केलेला कौतुकाचा वर्षाव विशेष लक्ष वेधतो.
किरण माने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणतो, “किरण्या, तिकीट का काढलंस? लै श्रीमंत झालास का?" असं म्हणत किशोर कदमनं माझ्या खिशात शंभर रूपये कोंबले... सत्तावीस वर्षांपूर्वी, 'स्ट्रगल'च्या त्याकाळात, शंभर रूपये खूप मोठ्ठे होते माझ्यासाठी.. मला नाटकाची नाईट ऐंशी रूपये मिळत होती ! तरीही पृथ्वी थिएटरवर जाऊन एक हिंदी दीर्घांक पहाण्यासाठी मी तिकीट काढलंवतं...”
पुढे म्हणतो, “प्रयोग सुरू झाला.. आणि त्या अभिनेत्याचा भन्नाट परफाॅर्मन्स पाहून अक्षरश: खुर्चीला खिळून गेलो... तासाभराच्या त्या अद्भूत अभिनयाच्या आविष्कारानं मना-मेंदूवर कब्जा केला... त्या दीर्घांकाचं नांव होतं ‘पियानो बिकाऊ है’ आणि तो अभिनेता होता सौरभ शुक्ला! ”
“...नंतर माझा मित्र प्रसाद वनारसे यानं त्याच दीर्घांकाचं मराठीकरण केलं-‘हॅलो’. अस्सल मराठमोळं वाटावं इतकं भन्नाट लिहीलंवतं त्यानं. ते स्क्रीप्ट मी घरी एकटाच वाचत बसायचो. घरातल्या घरात परफाॅर्मन्सही सुरू केले.. त्यानंतर हळूहळू या गोष्टीला पंधरा सोळा वर्ष उलटून गेली.तोपर्यन्त इकडे यथावकाश माझी व्यावसायिक नाटकातल्या करीयरची गाडी रूळावर आली होती. एक दिवस गडकरी रंगायतनमधल्या व्हिआयपी रूममध्ये लताबाईंना मी ‘हॅलो’चा परफाॅर्मन्स करुन दाखवला. त्यांना लैच आवडला. म्हणाल्या, “यावर तू दोन अंकी नाटक लिही. मी प्रोड्यूस करते.” ” (Marathi Actors)
आपल्या पोस्टमध्ये पुढे किरण माने म्हणतो, “सातारला माझा दोस्त झाकीरच्या घरी राजीव मुळ्ये आणि मी, दोघांनी अनेक चर्चा करुन पंधरा दिवसांत दोन अंकी नाटक लिहीले. बघता-बघता ‘श्रीचिंतामणी’तर्फे हे नाटक रंगभुमीवर आलंही.. नाटकाचं नांव होतं ‘ती गेली तेव्हा’ !”
“अभिनेता म्हणून हे लै लै लैच मोठ्ठं चॅलेंज होतं... सव्वादोन तास पूर्णवेळ मी स्टेजवर - आठ वेगवेगळ्या भूमिका.. वेगळी बेअरिंग्ज,भिन्न आवाज.. एकही 'ब्लॅकआऊट' नाही... सगळा कस पणाला लावणारं नाटक. मध्येमध्ये चार-पाच पात्रंही पेरली होती. नाटक थोडं आडवळणाचं असल्यामुळं मीच दिग्दर्शन करायचं ठरवलं.. हिराॅईन योगिनी चौक होती. रोहीत चव्हाण, अजिंक्य ननावरे या सातार्यातल्या माझ्या ग्रुपमधल्या कलाकारांनाही मी संधी दिली.”
तर किरण आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागात म्हणतो, “या नाटकानं अभिनेता म्हणून माझा आत्मविश्वास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला ! लोकसत्ताचे रविंद्र पाथरे यांनी अर्धा पान भरून लिहीलं. “किरण माने यांची आवाजावरची हुकुमत अलिकडच्या काळात कुठल्याच अभिनेत्यात नाही.” असंही लिहीलं.. तर म.टा.च्या जयंत पवार यांनी 'एक भक्कम नट' अशी भलीमोठी हेडलाईन दिली ! ठाण्याच्या मधुकर मुळुकांनी लिहीलं, 'मराठी रंगभुमीला काशीनाथ घाणेकर मिळाले.” (Entertainment News)
“आज मागं वळून पहाताना जाणवतं.. एका अफलातून अभिनेत्याच्या परफाॅर्मन्सपासून मिळालेली प्रेरणा आपल्याला कुठून कुठपर्यन्त घेऊन जाते ! लब्यू सौरभजी.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.